सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करणा-या अरूण वसंत बाविस्कर (४४,रा. कांचन नगर) या मजूराला हॅण्ड काँक्रीट मिक्सर वाहनाच्या चालकाने रिव्हर्स घेताना चिरडल्याची गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील स्मशाभूमीजवळ घडली आहे. यात मजूराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण वसंत बाविस्कर हे पत्नी व मुलासह शहरातील कांचन नगरातील उज्ज्वल चौकात वास्तव्याला होते. सेंट्रींगचे काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. सद्या पिंप्राळा स्मशानभूमीजवळील खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाण अरूण बाविस्कर हे देखील काम करत होते. गुरूवारी सकाळी १० वाजता रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना हॅण्ड काँक्रीट मिक्सर वाहन (एमएच.१९.डीयू.४६६१) चालक संजय राठोड (रा. रामदेववाडी) याने वाहन रिव्हर्स घेतले. त्यावेळी अरूण बाविस्कर हे वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा दबून जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून हा पसार झाला.----मृतदेह हलविले रूग्णालयातदरम्यान, सहकारी मजूर चाकाखाली असल्याचे लक्षात आल्यानंतर मजूर दिशेश शिंदे, विनोद महाजन, विवेक पाटील, समाधान सपकाळे, सुनल हरने, सुरेंद्र वाणी यांनी रूग्णवाहिका बोलवून तत्काळ बाविस्कर यांना जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. त्यानंतर दिनेश शिंदे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चालक संजय राठोड याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी सविता, तीन विवाहित मुली आणि सात वर्षाचा मुलगा शैलैश असा परिवार आहे.