जळगाव : किआ मोटरर्सची बऱ्हानपूर येथे डिलरशिप मिळवून देतो, असे सांगून विजय एकनाथ पाटील (रा.मोरगाव खुर्द, ता.रावेर) या व्यावसायिकाची दोन सायबर ठगांनी साडेपाच लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ठगांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
विजय पाटील यांचा ट्रॅक्टर डिलरशिपचा व्यवसाय आहे. त्यांना किआ कारचा डिलरशिपचा व्यावसाय सुरू करायचा असल्यामुळे त्यांनी ऑक्टोंबर-२०२२ मध्ये कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरली होती. त्यानंतर त्यांना २२ मार्च रोजी एक ई-मेल प्राप्त झाल्यानंतर २४ मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तुम्हाला डिलरशिप हवी असेल तर आम्ही जो खाते क्रमांक पाठविता आहे, त्यावर रक्कम भरण्यास भरावी लागेल, असे सांगितले. त्याच दिवशी पाटील यांनी साडेपाच लाख रूपये आरटीजीएद्वारे भरले. २४ मार्च रोजी त्यांना आणखी एका व्यक्तीचा फोन आल्यावर त्या व्यक्तीने फूल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून २६ लाख ७५ हजार रूपये भरण्यास सांगितले. पण, पाटील यांनी आपल्याकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यावर त्या व्यक्तीने जेवढी रक्कम तुमच्याकडे आहे, तेवढी भरण्यास सांगितली. पाटील यांनी १५ लाख रूपये आरटीजीएसद्वारे पाठविले. मात्र, ती रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यावर आली.
वारंवार पैसे भरण्याचा तगादा...दरम्यान, त्या व्यक्तीने विजय पाटील यांनी वांरवार संपर्क साधून पैसे भरण्याचा तगादा लावला. अखेर त्यांनी जळगावातील किआ शोरूममध्ये जावून संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्यांना तो फसणूकीचा प्रकार असू शकतो, त्यामुळे खात्री करूनच रक्कम पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पाटील यांनी संबंधित व्यक्तींना भेटण्यास सांगितल्यावर त्यांनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही सायबर ठगांविरूध्द गुन्ह्याची नांद करण्यात आली आहे.