- प्रशांत भदाणे
जळगाव- पानिपतच्या युद्धात दोन्ही बाजूकडील सैन्य मारले गेले होते. यात हजारो मराठा सैनिक होते. या युद्धावेळी शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी काही मराठा सैनिक आपल्या कुटुंबाला घेऊन ओळख लपवून जंगलात लपले होते. पुढं त्यांचं रोड मराठा असं नामकरण झालं. हे रोड मराठा दुसरे-तिसरे कुणी नसून महाराष्ट्राचेच वंशज आहेत, असा दावा हरियाणातील अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
शहरातील निंबाजी साळुंखे यांच्या कन्येचा विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी हरियाणातील अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेचे पदाधिकारी जोगिंदर डुमने, मनीराम चोपडे, भागसिंग बालदे, निवृत्त पोलीस सतबीर खोकरे, हरजित महाले आदी आले आहेत. लोकमतशी संवाद साधताना ते बोलत होते.
पानिपत युद्धाचा असा आहे संबंध-
हरियाणातील नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर हरियाणातील करनाल पानिपत याचा संबंध थेट महाराष्ट्राशी जोडला जातो. याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेला सुरुवात केली. १७ जानेवारी १७६१ साली अफगाणी राजा अहमद शाह अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांच्यात पानिपत येथे जे युद्ध झाले, त्यात हजारोंच्या संख्येने दोन्ही बाजूकडील सैन्य मारले गेले. यात हजारो मराठा सैन्य होते. यावेळी शत्रू मात करत असताना पाहताच जीव वाचवून काही मराठा सैनिक आपल्या कुटुंबासह जंगलात लपून बसले होते.
या भागात आपली मूळ ओळख लपवून रोड मराठा ही ओळख या कुटुंबीयांनी निर्माण केली. तेव्हापासूनच रोड मराठा असे नामकरण हरियाणातील पानिपतच्या युद्धात मारल्या गेलेल्या मराठ्यांच्या वंशजांना पडले, असे अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल राष्ट्रीय प्रवक्ते जोगिंदर डुमने यांनी सांगितले. आम्ही महाराष्ट्राचेच आहोत, त्यामुळे रोटी-बेटी व्यवहार यासह विवाह समारंभाला आम्ही हजेरी लावत आहोत, असेही जोगिंदर मराठा उर्फ डुमने यांनी सांगितले.
पानिपतच्या लढाईत मराठा हरलेले नाहीत!
पानिपतची लढाई मराठा हरले नव्हते. त्याला काही कारणे होती. त्याचा उहापोह करणे आता उचित होणार नाही. परंतु, पानिपतची लढाई जिंकल्यावर अहमद शाह अब्दाली याने तिथे राज्य न करता तो निघून गेला. याचाच अर्थ अब्दाली याला मराठा सैन्याची गनिमी काव्याने लढाई करण्याची ताकद कळलेली होती. इतिहास चुकीच्या पद्धतीने रचला गेल्याचे डुमने सांगतात. या विषयावर इतिहासाची पाने चाळून सत्य जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
हरियाणात ८ लाख मराठा समाजबांधव-
दरम्यान, हरियाणातील पानिपतसह अन्य चार ते पाच जिल्ह्यांमध्ये मराठा समाज असून त्याच्या प्रथा, परंपरा, खानपान अगदी महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा समाजाशी सुसंगत आहेत. त्यामुळे आम्ही पानिपत लढाईत धारातीर्थी पडलेल्या मराठा कुटुंबीयांचे वंशज आहोत. सुमारे २६० गावांमध्ये ८ लाख लोकसंख्येने हा मराठा विखुरलेला आहे. मराठा रेजिमेंटमध्ये आमची ३४ मुले कार्यरत आहेत. केंद्र सरकारने २००८ नंतर ही सैन्य भरती बंद केली. त्यामुळे लढवय्या असलेल्या मराठा समाजातील बहुतांशी तरुणांची सैन्यात भरती होण्याची इच्छा असतानाही सरकार त्याची परवानगी देत नाही. सैन्य भरती पुन्हा सुरू करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशीही एकमुखी मागणी या सदस्यांनी केली आहे. मराठा समाजातील या लोकांचा तिकडे शेती हाच मूळ व्यवसाय आहे. काही जण लहानसहान व्यावसायिक आहेत. आमची बहुसंख्य मुले नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात असल्याचं त्यांनी सांगितले.