जळगाव : मेहरूण तलाव परिसरातील एका गल्लीत चोरीच्या उद्देशाने फिरणा-या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी विशाल मुरलीधर दाभाडे (२४, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक शांताराम रेणूके (२०, रा. तांबापूरा), गुरूजितसिंग सुजाणसिंग बावरी (२१, रा. शिरसोली नाका, तांबापूरा) असे अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात विशाल दाभाडे याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती सोमवारी पहाटे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. मेहरूण परिसरातील एका गल्लीत अंधारात विशाल हा त्याचे साथीदार दीपक रेणूके व गुरूजितसिंग बावरी यांच्यासह पोलिसांना मिळून आला. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ सुरा आणि स्क्रु-ड्रायव्हर मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.विशालवर ७ तर गुरूजितसिंगवर १० गुन्हे
विशाल दाभाडे व गुरूजितसिंग बावरी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दाभाडे याच्याविरूध्द ७ गुन्हे दाखल असून बावरी याच्याविरूध्द तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, इम्रान सैय्यद, मंदार पाटील, चेतन सोनवणे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, संदीप धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.