जळगाव : राज्यातील नव्या राजकीय घडामोडींमुळे खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या खडसेंनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबत पाट लावला खरा; पण त्यांना मंत्रिपद मिळण्यापूर्वीच सत्तापालट होऊन खडसेंवर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. आता तर अजित पवार जवळपास सगळा पक्षच घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...तरच येतील त्यांना सुगीचे दिवस आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येऊन आपले स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा खडसे यांना वाटत होती; परंतु अचानक झालेल्या घडामोडींमुळे खडसेंची ही आशाही फोल ठरल्यात जमा आहे. शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी करण्याची ग्वाही दिली असली, तरी पवारांना ते कितपत शक्य होईल, याबाबत राजकीय निरीक्षकांना शंका वाटत आहे. अर्थात पवार त्यांच्या मनसुब्यात यशस्वी झाल्यास खडसेंनाही सुगीचे दिवस येऊ शकतात; पण त्यासाठी त्यांना प्रतीक्षाच करावी लागेल.