जळगाव : खान्देशासह विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांपर्यंत पसरलेल्या सातपुड्यातील वनसंपदा अविश्वसनीय असून, आतापर्यंत सातपुड्यात अतिशय दुर्मीळ वनस्पतींची नोंद झाली आहे. आता नव्याने वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी लिंडर्नीया समुहातील दोन प्रजातींची नोंद सातपुड्यात केली आहे. यामध्ये लिंडर्नीया डुबिया आणि लिंडर्नीया प्रोकुबंस या दोन प्रजातींचा समावेश असून, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेमध्ये या वनस्पती प्रथमच आढळून आल्या आहेत.
जळगाव शहरातील इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाचे प्राध्याप डॉ. तन्वीर खान हे वनस्पती अभ्यासासाठी सातपुडा पर्वत रांगेत गेले असता, त्यांना ही वनस्पती आढळून आली. लिंडर्नीया डुबीया ही वनस्पती नदी किनारी तसेच पाण्याच्या प्रवाहा शेजारी आढळते. १० ते २० से.मी. च्या या वनस्पतीला पांढऱ्या रंगाचे फुल असतात, विरुद्ध दिशेने पाने असतात, तसेच फळांमध्ये पिवळ्या रंगाचे बियां असतात. सातपुडा मध्ये याची ही प्रथम नोंद आहे. त्याचप्रमाणे लिंडर्नीया प्रोकुबंस या ३० ते ५० से.मी. च्या वनस्पतीला पांढऱ्या रंगांचे एकच फुल असते. फुलाला आतमध्ये पिवळे ठिपके असतात. बियांवर सुरकुत्या असतात. प्रोकुंबूस या वनस्पतीची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात, त्यामुळे काही लोक चुकीने याला मायमुलस स्ट्रीक्टस म्हणतात.
या नोंदीला मिळाली पृष्टीवनस्पतीच्या पृष्टीकरणासाठी डॉ.तन्वीर खान यांनी कोल्हापुर येथील डॉ.विनोद शिंपले, लखनौ येथील डॉ. प्रसाद यांच्याकडे पाठविली होती. त्यांनी सातपुड्यात आतापर्यंत या वनस्पतींची आधी नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या वनस्पतीवर तयार केलेला शोधनिबंध " जर्नल ऑफ इकोनोमीक ॲन्ड टेक्सानॉमी बॉटनी’ (जोधपुर) या विज्ञान पत्रिकेत प्रकाशीत झालेला आहे. यासाठी उमेश पाटील, मयुर जैन, अजहर शेख यांचे सहकार्य लाभले.
सातपुडा पर्वत रांग ही दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. काळानुरूप इथे नवनविन दुर्मीळ वनस्पतींचा शोध लागत आहे. अशा वनस्पतींचा संवर्धन करणे गरजेचे आहे. मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगेचे पुर्ण देशासाठी महत्व वाढत आहे. - डॉ.तन्वीर खान, इकरा एच.जे.थीम, महाविद्यालय