कुंदन पाटील
जळगाव : झोपलेल्या महानगरपालिकेने नवा धक्कादायक कित्ता गिरवला आहे. इच्छादेवी ते डी.मार्टपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाल्यावर अचानक जेसीबी ब्रेकरने खड्डे करीत भुयारी गटारींसाठी खड्डे खोदायला सुरुवात केली आहे.शनिवारी सकाळी घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांनी मनपाच्या ‘झोप’सोंगेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला. खड्डे खोदायला विरोध केल्याने मनपा प्रशासनाला जेसीबी ब्रेकर हलवावा लागला असून या गंभीर प्रकारानंतर महापालिकेच्या प्रशासनावर प्रचंड ताशेरे ओढले जात आहेत.
वादातीत आणि बहुचर्चित ठरलेल्या इच्छादेवी ते डी.मार्टपर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला दिले गेले. त्यानुसार या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून मनपाच्या अनेक गंभीर कारनाम्यांची खोदाई होत आहे. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होत आले असतानाही मनपाला गटारीच्या कामासाठी वेळ मिळाला नाही.त्यामुळे कॉंक्रिटीकरणाच्या कामालाही बाधा आली. नाईलाने २० मीटर कॉंक्रिटीकरणाचे काम थांबवत गटारीचे काम पूर्ण करण्यात आले. ते पूर्ण झाल्यावर मनपाला भुयारी गटारींसाठी चेंबर टाकायची आठवण झाली. त्यानुसार शनिवारी सकाळी मनपा प्रशासन कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर जेसीबी ब्रेकर घेऊन दाखल झाले. या मशिनद्वारे खड्डे खोदायला सुरुवात करताच स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला. या मशिनद्वारे खड्डे खोदण्यात येत असल्यामुळे रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण तडे जात असल्याचे लक्षात येताच मनपाने जेसीबी ब्रेकर मार्गस्थ केला. त्यानंतर मजुरांकरवी खोदकाम सुरु केली. चेंबरसाठी वेळेवर काम न करता कॉंक्रिटीकरण झाल्यावर खोदकाम करणाऱ्या मनपाच्या भूमिकेविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
झोपेचे सोंग की सोयीने ढोंग?२९ जानेवारीपासून या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला प्रारंभ झाला.तांबापुरा भागाच्या विरुद्ध बाजूचा रस्ता दि.२२ फेब्रुवारी रोजी सेवेत दाखल झाला. तर दि.५ मार्चपासून तांबापुऱ्याला लागून असलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. तरीही मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष नव्हते. ऐनवेळी रस्त्यातून आडवी जाणाऱ्या गटारीचे काम हाती घेतले. त्यासाठी काहीदिवस कॉंक्रिटीकरणाचे कामही रखडले.शनिवारी तर मनपाने कहरच केला. त्यामुळे मनपाच्या भूमिकेविषयी सातत्याने संशय निर्माण होत गेला.या रस्त्याचे काम सा.बां.विभागाच्या अखत्यारित असल्याने ‘टक्केवारी’चे गणित न जुळल्याने मनपाने जाणीवपूर्वक दुलर्क्ष केल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे.६ खड्डे खोदलेभुयारी गटारीसाठी असणाऱ्या चेंबरची आठवण झाल्यावर मनपाने शनिवारी चेंबरसाठी आठ खड्डे खोदले. जवळपास ६ फूट खोल आणि १० फूट रुंदीच्या या खड्ड्यांमुळे आठ दिवसांपूर्वीच झालेल्या कॉंक्रिटीकरणाची वाट लागली आहे. चेंबर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर आठही ठिकाणी कॉंक्रिटीकरण करावे लागणार आहे.