जळगाव: ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत आणि मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण करीत शनिवारी, जुने जळगावमध्ये बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असंख्य जळगावकरांच्या उपस्थितीत पार पडला. तरुण कुढापा मंडळातर्फे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे १५७ वे वर्ष होते.
यात्रोत्सवानिमित्त नेरी नाका परिसरात छोटेखानी जत्रा भरली होती. आखाजीसाठी घागर, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने लावण्यात आली होती. भगत नाना रवींद्र धनगर यांनी सायंकाळी बारा गाड्या ओढल्या. यावेळी जमलेल्या भाविकांनी मुक्त हस्ते भंडारा उधळत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष केला. नेरी नाका, जुने साधना विद्यालय, खळवाडी, खंडेराव मंदिर आणि परत नेरी नाका असा मार्ग होता.
बारा गाड्यांच्या पूजनप्रसंगी पियूष कोल्हे, डॉ. निलेश चांडक, डिगंबर पाटील, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, संजय चौधरी, तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष हितेश वाणी, उपाध्यक्ष चेतन मराठे, मुन्ना परदेशी, अनिल ठाकूर, शंभू भावसार, पंकज भावसार, सचिन चौधरी, भैय्या ठाकूर, प्रल्हाद पाटील, सुमित कोळी, राजू पाटील (नाना पाटेकर), मुन्ना बारी, कुंदन चौधरी, रवि चौधरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.