जळगाव : रवंजे येथून सराफ दुकान बंद करुन रोकड व दागिने असा ९ लाख रुपयांचा ऐवज घेऊन घरी जाणाऱ्या सराफाला लुटताना झालेल्या झटापटीत दुचाकी बंद पडली अन् तेथेच लुटारुंचा घात झाला आणि बिंग फुटले. दरोडा टाकण्याआधी सहाही जणांनी पद्धतशीरपणे नियोजन केले होते, त्याआधी त्यांना रवंजे गावातूनच टीप देण्यात आली होती, असेही आता पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ लाख ८५ हजार १२५ रुपयांचे ऐवज हस्तगत केला आहे.
एरंडोल तालुक्यातील चोरटक्की गावाच्या पुढे विखरण वन क्षेत्रात राजेंद्र बबन विसपुते (सोनार) रा.माळपिंप्री, ता.एरंडोल यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच जणांनी पिस्तूलचा धाक दाखवत शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन ५२ हजार रुपये रोख व दागिने असा ८ लाख ८७ हजार रुपयांचे ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी एरंडोल पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दागिने घेऊन निघाले अन् पाठलाग सुरु झालाविसपुते यांचे रवंजा येथे सराफ दुकान आहे. रोज दुपारी दोन वाजता दुकान बंद करुन ते दागिने व रोकड घेऊन माळपिंप्री येथे दुचाकीने रिंगणगाव, चोरटक्की मार्गे घरी जातात. विसपुते यांच्यावर पाळत ठेऊन गावातीलच एका जणाने जळगावच्या टोळक्याला आधीच टीप दिली होती. त्यांनी दु्कानातील रोकड व दागिने घेत घराचा रस्ता धरताच टीप देणाऱ्याने टोळक्याला फोन करुन माहिती कळविली. त्यानुसार आधीच तयारीत असलेले डिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (वय २३,रा.भोकर, ता.जळगाव ह.मु.कांचन नगर, जळगाव), विशाल अरुण सपकाळे (वय २२,रा.कोळी पेठ, जळगाव), विशाल लालचंद हरदे (वय २६,रा.चौघुले प्लॉट, जळगाव), संदीप राजू कोळी (वय २१,रा.कुरंगी, ता.पाचोरा ह.मु. कुसुंबा, ता.जळगाव), आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय २४,रा.रथ चौक, कोळी पेठ, जळगाव) व आकाश मुरलीधर सपकाळे (वय २४,रा.कांचन नगर, जळगाव) या सहा जणांनी दोन दुचाकीद्वारे विसपुते यांचा पाठलाग करुन वनक्षेत्रात त्यांच्यावर हल्ला चढविला. पिस्तूलचा धाक दाखवत ऐवज लुटून नेला होता. न्यायालयाने पुन्हा या सहा जणांच्या कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे. बुधवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.