धरणगाव : धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे एका खळ्यात हिंस्र प्राण्याने दहा बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान वन विभागाने लांडगा, कोल्हा किंवा तडस असू शकते असा अंदाज वर्तविला आहे. यात शेतकऱ्याचे किमान एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कल्याणे होळ ता. धरणगाव येथील लक्ष्मण दीपा पाटील यांचे नदीकाठी खळे आहे. तिथे बकऱ्या बांधलेल्या होत्या. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान लक्ष्मण पाटील खळ्यामध्ये गेले असता बकऱ्यांचा फडशा पडलेला पाहून त्याने टाहो फोडला. क्षणार्धात बातमी गावभर पसरली आणि सारे गाव तिथे जमा झाले.
सरपंच रमेश पाटील, पोलीस पाटील भिका पाटील यांनी वनाधिकारी एरंडोल व धरणगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर पावलांचे ठसे आणि बकऱ्यांचा फडशा पाडण्याचा प्रकार त्यांनी पाहिला असता हा प्राणी कोल्हा, लांडगा किंवा तडस असू शकतो असा अंदाज वर्तविला आहे. अंजनी परिसरात ज्यावेळी ऊस, केळीच मोठ्या प्रमाणात लागवड होत होती तेंव्हा देखील हिंस्र प्राण्यांची चाहूल या परिसरात लागलेली नव्हती. आता मात्र घराबाहेर पडणेही कठीण झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
बकऱ्यांचे मालक लक्ष्मण पाटील यांचा उदरनिर्वाह बकऱ्यांच्या पालन-पोषनातून होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. पंचनामा आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना दिली. या प्राण्यांच्या शोधासाठी वन विभागाने मोहीम राबवावी अन्यथा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे, प्रचंड भीतीमुळे लोक दिवसादेखील घराबाहेर पडायला घाबरत आहेत आधीच खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्याना रात्री-बेरात्री शेतात जावे लागते अशावेळी परिसरात हिंस्र प्राणी असल्याची भीती कायम लोकांच्या मनात राहणार आहे त्यामुळे हा प्राणी पकडण्यासाठी वन विभागाने मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणगावकऱ्यांना बिबट्याची भीती होती मात्र वनविभागातील तज्ज्ञांच्या मते बिबट्याची मारण्याची पद्धत अशी नाही त्यामुळे हा बिबट्या नाही तर अन्य हिंस्र प्राणी असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र या घटनेमुळे कल्याणे होळसह अंजनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.