अमित महाबळ, जळगाव: छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा नुकताच पार पडला, त्या अनुषंगाने जगातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन २६ ते २९ जून दरम्यान जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. संमेलनाच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर उभारणीस खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन व ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली. सोमवारी, सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रायगड, राजगड ,पुरंदर, सिंदखेडराजा व वेरूळ या किल्यावरून आणलेल्या मातीच्या कलशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार मनीष जैन, प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, सहकार भारतीचे दिलीप पाटील, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, प्रा.सुरेश कोळी (भडगाव), प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. डॉ. माधुरी पाटील, प्रा. के. बी. पाटील, इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे, रवींद्र पाटील, दिनेश नाईक, आदित्य धर्माधिकारी, प्रा. रायपुरे, प्रा. बियाणी तसेच नूतन मराठा महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संमेलनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूने एक वाहन जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. यामध्ये शिवसाहित्य व संमेलनाविषयी माहिती आहे. बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, गावांमध्ये हे वाहन जात आहे.
संमेलनाविषयी थोडक्यात...
उद्घाटक : सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसलेअध्यक्ष : शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुखप्रमुख उपस्थिती : कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजीराजे भोसले, नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजीराजे भोसले, तसेच छत्रपती शिवरायांचे सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वंशज
विशेष आकर्षण...
विश्वातील सर्वात मोठे नाणे संग्राहक किशोर चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शत्रप्रदर्शन, प्रवीण भोसले (सांगली) यांच्याकडील तीनशे मराठ्यांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन, संकेत गांगुर्डे यांचे पगडी प्रदर्शन, संतोष आवटी (जालना) यांचे चित्र प्रदर्शन, सतीश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन, महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन.
भरगच्च कार्यक्रम...
इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र आणि नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव, राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर, गड संवर्धन प्रतिष्ठान पुणे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र, श्री दादासाहेब केशवराव भोईटे इतिहास संशोधन मंडळ जळगाव यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित होत आहे. चार दिवस विविध कार्यक्रम, परिसंवाद, मुलाखती, प्रश्नोत्तरांसह अभ्यासक व संशोधक विषयांची मांडणी करणार आहेत. पुढील पिढीला उपयुक्त ठरेल अशा ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे.
अपूर्व संधी, जळगावकरांनी सहभागी व्हावे!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र साहित्यावर मंथन व्हावे आणि त्यातून एक नवा वास्तववादी प्रवाह समाज क्षेत्रासाठी खुला व्हावा या उद्देशाने या संमेलनाचे प्रयोजन आहे. जळगावकरांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी केले आहे.