लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चित्रपट गृह बंद आणि सुरु करण्यासाठी अनेक प्रक्रिया असतात. त्यामुळे मधल्या काळात दोन महिने चित्रपट गृह सुरु केल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे आता चित्रपटगृह बंद ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याचे जळगाव जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघाने म्हटले आहे.
प्रदर्शक संघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या चित्रपटगृह सुरू करता येणे कठीण आहे. त्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. तरच चित्रपटगृह सुरू करता येते. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होते. ते सहन करण्याची चित्रपटगृह मालकांची क्षमता संपली आहे. विभागातील सर्व महापालिका आणि मोठ्या नगरपालिकांमधून संपुर्ण निर्बंध उठवले तरच जुने आणि कमी दर्जाचे चित्रपट प्रदर्शित करता येतील. मात्र असे केल्याने चित्रपट गृहांच्या मालकांना नुकसान सहन करावे लागते. इतर व्यवसायांप्रमाणे हे सुरू किंवा बंद करणे शक्य नसते. त्यामुळे चित्रपटगृह बंदच ठेवावे लागतील.. हे निवेदन जळगाव जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे.
कोट - मधल्या काळात दोन महिने आम्ही व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. आता देशभरातील निर्बंध उठल्याशिवाय चित्रपट गृह सुरू करता येणार नाही - संजय सुराणा, चित्रपटगृह मालक