रामकृष्ण माधवराव पाटील (कोठली, ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोठली शिवारात रामकृष्ण माधवराव पाटील यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या १ गाय, १ वासरू तसेच प्रदीप हेमराज पाटील यांच्या शेतातील १ वासरू तसेच विनायक महादू पाटील यांच्या शेतातील १ गाय असे सर्व मिळून एकूण ४ जनावरे हे एकूण ७६ हजार रुपये किमतीच्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
भडगाव पोलिस स्टेशनला भा. दं. वि. कलम ३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास गीते हे करीत आहेत. जनावरे चोरीस गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या चोरीच्या घटनांनी पशुमालक, शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी कोठली परिसरातील शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे. मागीलवर्षीही कनाशी, देव्हारी शिवारात जनावरे चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. जनावरे चोरीस गेल्याच्या घटना वाढत असल्याने पशुमालक, शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस भीतीचे वातावरण पसरताना दिसत आहे.