जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीतून अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्यांसह पितळी क्वाॅईल चोरणाऱ्या दीपक यशवंत चौधरी (वय ३८, रा. टहाकळी ता. धरणगाव ह.मु. जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्याकडून चोरलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील सेक्टर सी मधील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रिज कंपनीत रविवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षक भूषण प्रकाश कोळी (वय २४, रा. मेहरुण) हा कामाला असताना तेव्हा एका रिक्षा (क्र.एम.एच १९ सी.वाय ३७०) स्टोअर सुपरवायझर जीवन चौधरी यांनी कंपनीत आतमध्ये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार रिक्षाचालक दीपक चौधरी हा रिक्षा आत घेऊन गेला. दरम्यान, रात्री ९.२० वाजेच्या सुमारास रिक्षा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली असता सुरक्षा रक्षक भूषण कोळी यांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी जीवन चौधरी व हितेश कोल्हे सोबत आले व म्हणाले की ‘तू कशाला गाडी अडवतो जाऊ दे बाहेर’ असे म्हटले. या रिक्षात २ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या तांब्याच्या पट्ट्या आणि १२ हजार रुपये किंमतीचे पितळी कॉईल असा एकूण २ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बाहेर नेण्यात आला. सुरक्षा रक्षक कोळी याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुपरवायझर जीवन चौधरी, हितेश कोल्हे व रिक्षा चालक दीपक यशवंत चौधरी या तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे.