लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन कक्षातील एक मल्टी पॅरा मॉनिटर चोरीला गेल्यानंतर आता कक्ष बारा मधील आणखी चार मॉनिटर चोरीला गेले आहे. याबाबतही पोलिसात तक्रार देण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावरील सर्वच कक्षांना सील केले आहे.
कोविड रुग्णालयात २३ नोव्हेंबर रोजी कक्ष १२ मध्ये ॲाक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू केल्याने या ठिकाणचे ३१ रुग्ण हे खालच्या कक्षांमध्ये हलविले होते. त्यावेळी संपूर्ण स्टाफही खालच्या मजल्यावरच कार्यरत होता. दरम्यान, आपत्कालीन विभागातील एक मॉनिटर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्या अनुषंगाने अन्य कक्षांमधील मॉनिटरची तपासणी केली असता ३० डिसेंबर रोजी चार मॉनिटर नसल्याचे उघड झाले होते. जिल्हा पेठ पोलिसात तक्रार केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए वाघमारे यांनी शुक्रवारी या कक्षांमध्ये पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली आहे. दरम्यान, ही मॉनिटर दुरूस्तीला पाठविण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. हे मॉनिटर छोटे असून पहिल्यापेक्षा कमी किमतीचे असल्याचे सांगितले जात आहे.
कक्षांना टाळे आणि सह्यांचा कागद
दुसऱ्या मजल्यावरील सर्वच कक्षांना टाळे लावून खाली एक कपडा लावण्यात आला आहे. शिवाय कुलुपांवर एन. एस. बालोद यांची स्वाक्षरी करून हे कक्ष बंद करण्यात आले आहेत.
रुग्णालय अर्धा तास अंधारात
कोविड रुग्णालयात दुपारी १२ ते १२:३० दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयात अंधाराचे सावट पसरले होते. अतिदक्षता विभागात मात्र, जनरेटवर वीजपुरवठा सुरू होता. वीज नसल्याने सीसीटीव्ही बंद असतात का? अशी विचारणा डॉक्टरांना केली असता ते वेगळ्या युनीटवर पूर्ण वेळ सुरू असतात असे सांगण्यात आले.