लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत; परंतु तरीही विनानंबर असलेल्या वाहनांतून चोरट्या मार्गाने ही वाहतूक सुरूच असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली अवैध गौण खनिज वाहतूक बेसुमार सुरू आहे आणि शहरासह तालुक्यात ओम्नी, ट्रॅक्टर, डंपर अशी शेकडो वाहने या बेकायदा अवैध गौण खनिज चोरी प्रकरणात गुंतलेली आहेत. शासनाच्या स्वामीहक्कावर दिवसाढवळ्या दरोडे टाकणाऱ्या या वाहनांवर आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या आहेत, त्या कारवायांपेक्षा कितीतरी अधिक अवैध उपसा वाळूमाफियांनी केला आहे.
विनाक्रमांक असलेल्या वाहनांतून बिनधास्तपणे अवैध गौण खनिजाची सर्रास चोरी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी विनानंबरचे चार ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. अनेक वर्षांपासून तालुक्यात वाळूचा लिलाव झालेला नाही, तरीही दररोज मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. गिरणा नदीपात्रातून, नाले व धरणातून वाळू उत्खनन केले जात आहे.
निनावी वाहने रस्त्यावर, परिवहन अधिकारी आहेत कुठे?
चाळीसगाव तालुक्यात एकीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत असताना, दुसरीकडे अवैध गौण खनिज चोरीने अक्षरशः कहर केला आहे. राजकीय पक्षांच्या आडून काही पांढरपेशे ओम्नी, ट्रॅक्टर, डंपर यातून मुरूम, वाळू यासारख्या गौण खनिजाची वर्षानुवर्षे वाहतूक करत आहेत. अवैध गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी महसूल स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके वेळोवेळी अवैध गौण खनिज चोरी रोखण्याचे काम करत असतात. त्यात बऱ्याचवेळा अवैध गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करणारी वाहनेही पकडली जातात. मात्र, केलेल्या कारवायांत ९० टक्के जप्त केलेली वाहने ही कुणाची आहेत, हे समोर येत नाही. निनावी क्रमांकाची ही वाहने असतात. वास्तविक प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार रस्त्यावर धावणारे कुठलेही वाहन हे विनाक्रमांकाचे असेल तर त्या वाहनधारकांवर कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र, चाळीसगाव शहर व तालुक्यात राजरोसपणे ओम्नी, ट्रॅक्टर व अन्य वाहनेही विनाक्रमांकाने धावतात व बरीचशी वाहनेही मुरूम, वाळू यासारख्या गौण खनिजाची चोरी करतात. मात्र, रस्त्यांवर सर्रासपणे विनाक्रमांक धावणारी ही वाहने आरटीओ विभागाला दिसत नाहीत का? अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे.
गिरणेचे वस्त्रहरण सुरूच
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण समितीकडून चाळीसगाव तालुक्यातील सात वाळू गटांना मंजुरी मिळत नसल्याने या वाळू गटांचे लिलाव रखडले आहेत. एकीकडे या वाळू गटांना मंजुरी मिळत नाही तर दुसरीकडे मात्र वाळू चोरीचे सत्र सुरूच आहे. वाळू माफियांकडून गिरणेतील वाळूची खोदाई सुरूच आहे.
गणपूरला रात्री पकडले चार ट्रॅक्टर
तहसीलदार अमोल मोरे यांनी रविवारी मध्यरात्री दीड वाजता स्वत: आपल्या पथकासोबत उपस्थित राहात गणपूर शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. तसेच वडगाव लांबे येथेही पथकाने दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. महसूल प्रशासन कोरोनाच्या उपाययोजना राबविण्यात गुंतल्याने त्याचा फायदा घेत वाळू माफिया गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरी करत आहेत. बैलगाडी, ओम्नी कार, ट्रॅक्टर अशा वाहनांद्वारे वाळू चोरून ती चढ्या भावाने विकली जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाला कोरोना व अवैध गौण खनिज वाहतूक या दोघांना रोखण्यासाठी दिवस-रात्र एक करावा लागत आहे. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणपूर शिवारातील नाल्यात वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडण्यात आले. या ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व वाहने विनाक्रमांक वाळू वाहतूक करणारी आहेत. अशी आणखी किती वाहने गणपूर मार्गावर कधीपासून अवैध गौण खनिजाची वाहतूक करत आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे.