जळगाव - भाजपचे हिंदूत्व घरे पेटविणारे आहे, तर आमचं हिंदूत्व चुली पेटविणारे आहे. आज जात, धर्म यावर भांडणं लावली जात आहे. महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आम्ही सत्तेत असताना मंत्र्यावर आरोप झाला, लगेच त्याला गेटआऊट केले. यांच्या काळात महिलांना शिव्या देणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवले जाते. मग खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतान आमचे सरकार यापुढे महिला, शेतकरी, युवक व गरीब घटकांवर काम करेल, असे सांगितले. मग दहा वर्षे तुम्ही सत्तेत होते, इतक्या वर्षात का नाही केले. आज महाराष्ट्रच नाही तर देशातील हे चारही घटक सरकारवर नाराज आहेत. प्रत्येक भागात आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिमेवर रोखले जात आहे. त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. काश्मिरमध्ये कलम ३६९ लागू केले, त्याचे आम्हीही मोठ्या आशेने समर्थन केले होते. मात्र आज लडाख स्वतंत्र राज्य झाले, मात्र तेथे केंद्र सरकारची काहीच मदत मिळत नाही.