ऑनलाईन लोकमत जामनेर,दि.4 - तालुक्यातील मालदाभाडी जवळील स्टार्च प्रकल्प (हॉनेष्ट कंपनी) चे दूषित पाणी काळखेडे शिवारात नेऊन सोडणा:या पाईप लाईनचे काम सोमवारी सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी आंदोलन करून बंद पाडले. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून फॅक्टरीपासून 7 ते 8 किलोमिटर अंतरावरील काळखेडे व नागणचौक। शिवारातील काही जमीन अधिग्रहित केले आहे. या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्या जमिनीत हे पाणी सोडले जाणार होते. सोमवारी सकाळी नऊ वाजेचे सुमारास जे.सी.बी.द्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम व चारी खोदली जात असताना काळखेडे ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली. काम थांबविण्यासाठी नागरिकांनी जे.सी.बी. वर चढून आंदोलन केले. काम बंद न केल्यास विषप्राशन करून आत्महत्त्या करण्याचा इशारा सुद्धा यावेळी ग्रामस्थांनी दिला. एक तासानंतर फॅक्टरीचे दोन कर्मचारी व मंडळ अधिकारी, तलाठी आल्यावर पंचनामा करून काम बंद करण्यात आले.
मालदाभाडी स्टार्च फॅक्टरीचे दूषीत पाणी काळखेडे शिवारात येत असल्याने त्या दूषित पाण्याला सर्व गावक:यांचा विरोध आहे. या दूषित पाण्यापासून जमिन नापिक होते. तसेच ते पाणी आरोग्यास हानिकारक आहे. योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.