जळगाव : महावितरण कंपनीने ६७ हजार कोटींची तूट भरून काढण्यासाठी तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास मे महिन्यापासून ग्राहकांच्या बिलात भरमसाट वाढ होणार आहे.
मुंबई महानगर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने जानेवारी महिन्यात विद्युत नियामक आयोगासमोर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली असून, सन २०१९ पासून ते २०२४-२५ पर्यंत सहा वर्षांमधील तूट म्हणून ६७ हजार ६४४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. पुढील दोन वर्षांत त्यांना ही रक्कम वसूल करायची आहे. महावितरणच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ सरासरी ३७ टक्के आहे. प्रती युनिटमागे २.५५ पैसे एवढी वाढ आहे. लघुउद्योग भारतीने शेतीपंपाचा वीज वापर दुप्पट दाखवून किमान १५ टक्के अतिरिक्त वीज गळती लपवली जाते. ही वीज गळती म्हणजे सुमारे १३ हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अन्य गंभीर मुद्यांकडेही लक्ष वेधले आहे.
संघटना पदाधिकारी म्हणतात...
सर्वांत जास्त दर महाराष्ट्रात प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात १० हजार हरकती विद्युत आयोगाकडे दाखल झालेल्या आहेत. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतकरी यांचे वीज दर देशात सर्वांत जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे दर कमी करून ते देश पातळीवर सम व स्पर्धात्मक पातळीवर आणावेत. शेतकऱ्यांचे सवलतीचे दर निश्चित झाले पाहिजेत, तरच शेतीला प्रोत्साहन मिळेल. या पद्धतीचा निकाल आयोगाने घ्यावा आणि त्याच दृष्टीने राज्य सरकारने आपले म्हणणे स्पष्ट करावे.- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
दरवाढ म्हणजे विकासाला फटका
लघु उद्योग भारतीने वीज दरवाढीच्या विरोधात हरकत नोंदवली आहे. प्रस्तावित वीज दरवाढ करू नये, अशी मागणी केली आहे. अन्यथा याचा मोठा फटका उद्योगांना, राज्याच्या विकासाला बसेल.- समीर साने, सचिव, लघू उद्योग भारती, नाशिक विभाग
महाराष्ट्र आणि गुजरातमधील राज्यांतील वीज दराची तुलना
महाराष्ट्रातील दर, घरगुती दर (सिंगल फेज)
युनिट- प्रति युनिट दर-इंधन समायोजन आकार
० ते १०० - ३.३६-०.६५
१०१ ते ३०० - ७.३४ - १.४५
३०१ ते ५०० - १०.३७ - २.०५
५०१ ते १००० - ११.८६ - २.३५
१००० पेक्षा जास्त - ११.८६ - २.३५
- स्थिर आकार १०५ रुपये
(वरील दर १ एप्रिल २०२२ पासूनचे आहेत.)
- १ एप्रिल २०२० पासून महापालिका क्षेत्रातील ग्राहकांना १० रुपये प्रति महिना अतिरिक्त स्थिर आकार.
अहमदाबादमधील वीज दर (खासगी वितरण कंपनी)
आरजीपी (निवासी)
युनिट - दर - स्थिर आकार (सिंगल फेज)
० ते ५० - ३.२० - २५.००
५१ते२०० - ३.९५ - २५.००
उर्वरित - ५.०० - २५.००
(वरील वीज दर १ एप्रिल २०२२ पासूनचे आहेत.)