लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहीद भगतसिंग यांच्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या विरोधात गद्दारी करणाऱ्या फनिंद्रनाथ घोष, जय गोपाल व हंसराज गोरा यांना मारण्याचा कट आजच्या ९१ वर्षांपूर्वी जळगाव कोर्टात झाला होता. मात्र हा कट थोडक्यात हुकल्याने भगतसिंग यांच्या संघटनेच्या विरोधात काम करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकली नव्हती. या घटनेला २१ फेब्रुवारी रोजी ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी संसदेवर हल्ला केला. नंतर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर भगतसिंग यांच्या संघटनेविरोधात त्यांच्या संघटनेतील काही सदस्यांनी गद्दारी करून, इतर सदस्यांची नावे देखील तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांना दिली होती. यामध्ये फनिंद्रनाथ घोष, जय गोपाल, हंसराज गोरा यांचा समावेश होता. जय गोपाल यांच्या साक्षीवरून भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना देखील शिक्षा झाली.
गुजरात स्वीट मार्टच्या जागेवर होते कोर्ट
भगतसिंग यांच्या विरोधातील खटला लाहोर येथील न्यायालयात चालला होता. त्यानंतर माफीचे साक्षीदार झाले होते. जय गोपाल, हंसराज गोरा, फनिंद्रनाथ घोष यांना जळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. याच ठिकाणी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य भगवानदास माहूर व सदाशिवराव मलकापूरकर यांना देखील हजर करण्यात आले होते. देशाविरुद्ध गद्दारी केली म्हणून मलकापूरकर व माहूर यांनी तिन्ही गद्दारांना बंदुकीने उडवण्याचा कट आखला होता. मात्र ऐनवेळी हा कट इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे अपयशी ठरला होता. १९३० मध्ये जळगाव कोर्टाचे काम सध्याच्या गुजरात स्वीट मार्टच्या समोरील इमारतीत सुरू होते. या घटनेला २१ फेब्रुवारी रोजी ९१ वर्षे पूर्ण झाली.