जळगाव : आर्किड हॉस्पिटलचे संचालक डॉ.नरेंद्र दोशी यांच्या पत्नी भारती (वय ७२) यांचे हातपाय बांधून व तोंड दाबून घरातील रोकडसह पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लुटण्याचा डाव मोलकरीन यशोदाबाई सिदप्पा गवळी (वय ४०, रा.पळासखेडा, ता.जामनेर) हिनेच रचल्याचे उघड झाले असून तिचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांनी ही लुट केली आहे. या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
चोरट्यांकडून दोन लाख रुपये रोख, ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ बांगड्या, १० ग्रॅमची एक सोन्याची पोत, दोन पासपोर्ट व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित रक्कम व दागिनेही लवकरच जप्त केले जातील अशी माहिती शिंदे यांनी दिली. गुन्हा घडल्यापासून शहरातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तपासाला लागल; होते. आठ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले.पोलीस अधीक्षकांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, जिल्हा पेठचे निरीक्षक सुनील गायकवाड, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम, शहरचे एकनाथ पाडळे, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख,एन.बी.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.