लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील २० ते २५ रहिवाशांच्या नळांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी येणे बंद झाले आहे. यामुळे रहिवाशांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या बाबत रहिवाशांनी मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र,अद्यापही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी ''लोकमत'' कडे व्यक्त केली.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या भागात प्रत्येक नागरिकाकडे नळ कनेक्शन आहे. परिसरात सार्वजनिक बोअरवेल अथवा कुपनलिका नसल्याने नागरिकांना या नळानद्वारेच पाणी साठा करावा लागतो. मात्र,या ठिकाणच्या २० ते २५ रहिवाशांच्या नळांना काही पाणी येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाईपलाईन मध्ये गाळ किंवा कुठेतरी गळती होत असल्याने नळांना पाणी येणे बंद झाले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
तक्रार करूनही दखल नाही
या भागातील रहिवाशांनी सांगितले की, नळांना पाणी येत नसल्याबाबत मनपाच्या या भागातील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार केली.यावेळी त्यांनी या बाबत पाहणी करणार असल्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले. माञ, संबंधित अधिकारी फक्त आश्वासन देत असल्यामुळे, येथील काही रहिवाशांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागात जाऊन, तेथील अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन महिन्यात पाच ते सहा वेळा त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र, आश्वासना व्यक्तिरिक्त अद्याप या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या दूर केली नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अचानक पाणी कसे बंद झाले, याबाबत मनपा प्रशासनाकडे आम्ही रहिवाशांनी तक्रार केली आहे. परंतु, अद्याप मनपाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही. दोन महिन्या पासून आम्हाला पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.
विमलबाई भालेराव, रहिवासी
नळांना पाणी येत नसल्याने, आम्हाला दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. मात्र, यात पिण्याचे पाणीही पूर्ण होत नाही. तसेच या ठिकाणी सार्वजनिक नळ अथवा बोअरवेल नसल्याने खूपच हाल होत आहेत. दोन महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात आम्हाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
आशाबाई भालेराव,रहिवासी
या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत या भागातील मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रत्यक्ष भेटुन तक्रार केली. या बाबत त्यांना वारंवार भेटूनही अद्याप दखल घेतलेली नाही. या रहिवाशांना इकडून-तिकडून पाणी आणावे लागत आहे. या प्रकाराकडे आता महापौरांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सतीश बागुल, रहिवासी
मनपाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येशी काही घेणे-देणे नाही. दोन महिन्यापासून तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या सोडविली नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करायला हवी, तरच हे अधिकारी नागरीकांच्या समस्या सोडवतील.
गौरव बागुल,रहिवासी