लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक असून यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे त्यात ऑक्सिजन पुरवठा करावा लागणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यात ही बिकट परिस्थिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये अधिक संसर्ग वाढला आहे.
गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या काळात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर आहे. महिना अद्याप संपलेला नसून २० हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत. मोठ्या प्रमाणात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या या आठवडाभरात वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्येही रुग्णांना जागा मिळत नाही.
गेल्या आठवड्यात ऑक्सिजनवरील रुग्ण : ६४५
२७ मार्चपर्यंत ऑक्सिजनवरील रुग्ण : ९१२
लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात : २२०१
लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २७ मार्च रोजी : २५७४
सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात : ९७०१
सक्रिय रुग्णांची संख्या २७ मार्च रोजी : १०९४२
एकीकडे बेड मात्र रुग्ण वाऱ्यावर
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे, मात्र, हे बेड अद्याप वापरात आलेले नाही. या ठिकाणी नॉन कोविड ओपीडी हलविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी बाधित रुग्णांना दाखल करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, येत्या दोन दिवसात याबातही निर्णय होणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी पुन्हा मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सामान्यांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे.