काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही, डॉ.केतकी पाटीलही भाजपात जाणार नाहीत; प्रदीप पवार यांचे स्पष्टीकरण
By सुनील पाटील | Published: August 30, 2023 05:57 PM2023-08-30T17:57:43+5:302023-08-30T17:58:05+5:30
जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे.
जळगाव : शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. काँग्रेसमध्ये फूट पडत नसल्याचे पाहून विरोधक पक्ष प्रवेश व फुटीच्या वावड्या उठवत आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील अशा वावड्या उठविल्या जात आहेत, मात्र त्या कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी केला.
जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी प्रदीप पवार यांनी शनिवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली असता त्यात त्यांनी पक्षफुटीबाबत होत असलेल्या चर्चा व अफवांबाबत स्पष्टीकरण केले. काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा ऑनलाईन आहे. जो कोणी पक्षाचा कधी सदस्यच नाही. कोणी तरी कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो आणि तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसमध्ये खिंडार पडले असे विरोधकांकडून भासविले जात असून दिशाभूल केला जात आहे. कॉग्रेसमध्ये कदापीही फूट पडणार नाही. डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी आहेत, त्यांनीही आपण व मुलगी कधीही कॉग्रेस सोडणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे तरी देखील काही जण वावड्या उठवत असल्याचे पवार म्हणाले.
आज इंडिया जितेगाचा आनंदोत्सव
भाजप विरोधी पक्षांनी इंडिया नावाने आघाडी उघडली आहे. लोकसभेत हीच आघाडी जिंकणार असल्याने त्याचा आनंदोत्सव गुरुवारी प्रत्येक तालुक्यात केला जाणार आहे. जळगाव शहरात कॉग्रेस भवनात हा जल्लोष होईल.
सोनिया व राहूल गांधींच्या स्वागताला २०० कार्यकर्ते जाणार
मुंबईत १ सप्टेबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यासाठी सोनिया गांधी, राहूल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे दुपारी एक वाजता मुंबईत दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते कॉग्रेसचे मुख्यालय टिळक भवनापर्यंत मानवी साखळी तयार केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जळगावातून २०० कार्यकर्ते गुरुवारी रात्री मुंबईला रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.