अमित महाबळ - जळगावजळगाव : जिल्हा काँग्रेसमधील गटबाजीला फुलस्टॉप लागलेला नाही. प्रदेशकडून प्रभारी येऊन जातात, आढावा बैठक घेतात; पण एक गट आत्मसन्मानासाठी चार हात लांबच राहतो, तर दुसरा आपल्याच समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करून घेतो. पक्षाला निवडणुकांना सामोरे जायचेय; पण दुरावलेली मनेच जुळत नाहीत म्हटल्यावर एक खासदार आणि पाच आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य साध्य होणार कसे ? अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’अशी अवस्था दिसायची.
जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. वर्चस्वाची स्पर्धा आहे. एकाला मित्र प्रिय आहे, तर दुसऱ्याला पक्ष महत्त्वाचा वाटतोय पण दोन्ही चाके सांभाळून गाडा ओढून नेणारे सक्षम नेतृत्व पक्षाकडे नाही. पक्षातले काही जण जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यावर नाराज आहेत. पवार यांच्या पाठीशी आमदार शिरीष चौधरी आहेत. ते पक्षाचे एकमेव आमदार आहेत. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची आजची भूमिका स्वत:चा व्यवसाय सांभाळून मग राजकारण अशी आहे. पक्षाला पूर्णवेळ देणारा, कार्यकर्त्यांचे ऐकून घेऊन त्यांची कामे मार्गी लावणारा आणि ऊर्जितावस्था आणेल असा नेता हवा आहे.
गोलमाल भूमिका
पक्षात उघडउघड दोन गट एकमेकांविरोधात आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. प्रभारी आल्यावर असंतुष्टांच्या गटाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष हटावची मागणी केली. रात्रीतून असे काही घडले की दुसऱ्या दिवशी असंतुष्टांचा गट पक्षाच्या आढावा बैठकीत दिसलाच नाही. त्यांच्या तक्रारींमुळे दुखावलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला कार्यकर्त्यांचे किती समर्थन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न बैठकीत केला. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी विनायक देशमुख हजर होते. त्यांनी अशा शक्तिप्रदर्शनाला त्याचक्षणी रोखले नाही; मात्र बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गटबाजीत स्वारस्य नसल्याचे सांगितले. त्यांची नेमकी भूमिका काय म्हणायची ? यातून ते जिल्हाध्यक्ष पवार यांच्या पाठीशी आहेत, असा संदेश दुसऱ्या गटात गेला.
आमदाराचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न
प्रभारींना पक्ष वाढवायचा असेल तर गटांना एकत्र आणावे लागेल. काम करणाऱ्यांना संधी द्यावी लागेल. पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. सहकारी घटक पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसमध्ये त्या दृष्टीने शांतता आहे. रावेरचे आमदार शिरीष चौधरी नाराज आहेत. पक्षातून त्यांचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न चालला आहे. ते भाजपात जाणार असल्याची अफवा पसरविणारे पक्षातीलच आहेत; पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा त्यांचा त्रागा होता. राजकारणात जे अपेक्षित नव्हते ते गेल्या साडेतीन महिन्यात घडून गेले आहे. त्यासंदर्भाने प्रभारींना जळगाव जिल्ह्यात काळजी घ्यावी लागणार आहे.
लोकांनी काँग्रेसकडे यावे कशासाठी ?
युवक काँग्रेस मोठी ताकद आहे. बाकीचे सेल / आघाड्या आहेत. त्यांना वाढवले पाहिजे. भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी नको असलेल्यांनी जायचे कुठे, काँग्रेसमध्ये यावे तर पक्षाकडे आहे तरी काय ? गटबाजीला वेळीच विराम लागला नाही, तर जे आज पक्षात दिसत आहेत तेही पक्षापासून दूर जातील. त्याची सुरुवात झाली आहे. धरणगावचे काँग्रेसचे निष्ठावंत डी. जी. पाटील यांच्या मुलाने नुकतीच भाजपाची वाट धरली आहे. एका दिवसांत चमत्कार होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना नाही. पाच-पन्नास कार्यकर्त्यांच्या भरवशावर पक्ष चालत नाही. पण पक्ष कार्यालयातील कार्यक्रमांचे फोटो पाहिल्यावर पक्ष कसा चालतो हे चाणाक्ष नजरेतून सुटल्याशिवाय राहत नाही.