येणाऱ्या २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही. हरणार म्हणजे हारणारच. हे त्यांनाही कळलेले आहे. आता लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या समोर आता दोनच पर्याय आहे. एक तर, सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलेला, तो सर्वात घातक पर्याय आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, तो पुलवामातील हल्ला यांनीच घडवला होता. म्हणजे तुम्ही निवडणुकीसाठी माझ्या देशातील जवानांच्या जीवाशी खेळत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. एवढेच नाही, तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते जळगाव येथे एका सभेला संबोधित करत होते.
युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही -"जो जवान या भारत मातेच्या रक्षणासाटी गोळी खायला तयार असतो. त्याचा जीव तुम्ही तुमच्या राजकारणासाठी घेऊ शकता. सर्जिकल स्ट्राइकसुद्धी तुम्ही करू शकता? युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही. सैन्य, जवान हे देशासाठी असतात, ते तुमच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसतात," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, "ते एकतर तसा तमाशा करू शकता किंवा त्याही पेक्षा जो घातक मुद्दा सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलाय, की येत्या काही दिवसांत राम मंदिराचं उद्घाटन होईल. तारीख ठरतेय. मला कुणी सांगितले की, शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवाशी २३ जानेवारीला करतायत. म्हटले चांगले आहे, स्वागत आहे, पण डाव असा असू शकतो की, राम मंदिरासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने हिंदू बोलवायचे. बस गाड्या ट्रेनमधून यायचं आणि कार्यक्रम झाल्यानंतर, परततांना मधेच कुठे तरी गोध्रा घडवायचा. करू शकतात, हल्ला होऊ शकतो. कोणत्या तरी वस्तीत बस जाळतील, दगडफेक करतील, माणसं मारतील. पुन्हा देश पेटेन, पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील आणि त्या पेटलेल्या घरांच्या होळ्यांवर त्यांच्या राजकीय पोळ्या ते भाजतील. हे सर्व त्यांचे डावपेच आहेत."