मुंगसे, ता.अमळनेर : एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पाचशे मीटर अंतराच्या आत असलेल्या अंगणवाड्यांचे समायोजन इतर अंगणवाडी केंद्रांमध्ये करता येणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी मुंबई येथे झालेल्या चर्चेतून स्पष्ट केले.जिल्ह्यातील पाचशे मीटरच्या आतील कमी लाभार्थी असलेल्या २२३६ अंगणवाड्यांचे समायोजन करणार असल्याचे जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास अधिकारी राफिक तडवी यांनी पत्राद्वारे प्रसिद्ध केले होते. या पत्राने एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता कर्मचाऱ्यांची भीती काहाशी निवळली आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष (ठाणे) एम.ए.पाटील यांच्यासह काही प्रतिनिधींनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंदामालो यांची मंबई येथे भेट घेतली. चर्चेमध्ये त्यांनी उच्च न्यायालयाचा स्थगन आदेश सादर केला. त्यावर कुठल्याही अंगणवाडीचे समायोजन तसेच कोणतेही कर्मचारी कमी होणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.बालविकास प्रकल्पांतर्गत गावातील ज्या अंगणवाड्या ५०० मीटरच्या आत आहेत, त्यांची माहिती प्रकल्प कार्यालयातून आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आलेली आहे. काही गावांतील बरीच अंगणवाडी केंद्रे ५०० मीटरच्या आत आहेत. अशा परिस्थितीत एक अंगणवाडी केंद्र बंद करून दुसºया केंद्रात त्याचे समायोजन करुन उर्वरित अंगणवाडी केंद्रे बंद करण्यात येणार असल्याचा अर्थ लावण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते व प्रतिनिधींनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांची नवी मुंबई येथे १० जुलै रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. दरम्यान, याबाबतचा संभ्रम दूर करण्यात आला असल्याचे एम.ए. पाटील व बृजपाल सिंह वाघेल यांनी सांगितले.मा.उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही अंगणवाडी केंद्राचे समायोजन करता येणार नाही, असा आदेश मा. उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर २०१८ रोजी काढला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांनी घाबरून जाऊ नये. समायोजन आणि नोकरीवरून कमीची भीती काढून टाकावी. तसेच ठाणे संघाचे सदस्य व्हावे. यातून मार्ग काढण्याच्या नावावर लूट करणाºयांपासून सावध राहावे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, ठाणेचे संघटक सचिव भानुदास पाटील, जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण, गोकुळ सुरळकर, धम्म भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पाचशे मीटरच्या आतील अंगणवाड्यांचे समायोजन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 9:39 PM