लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील यावल आणि रावेर या तालुक्यांमधील वाळू गटांचे लिलावच होत नाही. हे वारंवार लिलाव प्रक्रिया करून देखील त्यासाठी बोली लावायला कुणीही समोर येत नाही. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यासोबतच भोकर ता. जळगाव येथील वाळू गट हा सर्वात मोठा वाळू गट आहे. तेथे १६ हजार ब्रास वाळू उत्खनन केले जाऊ शकते. मात्र या गटाचा लिलाव झालेला नाही.
या ठिकाणी वडगाव, आंदलवाडी, निंभोरा, केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी या गटांचा गेल्या तीन-चार वर्षांपासून लिलावच होत नाही. सुकी आणि तापी नदीवर असलेल्या या वाळू गटांसाठी लिलावात कुणीही बोली लावत नसल्याचे समोर आले आहे.
या आठही वाळू गटांमध्ये मिळून जवळपास आठ हजारपेक्षा ब्रासपेक्षा जास्त वाळू आहे. त्यासोबतच जळगाव तालुक्यात असलेला भोकरचा वाळू गट हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा वाळू गट आहे. तेथे १६ हजार ११३ ब्रास वाळूचा साठा आहे. या गटात ४ हेक्टर ५६ आर उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे.