लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी रुग्णालयांकडून आकारले जाणारे दर संयुक्तीक आहेत का नाहीत यांच्या तपासणीसाठी लेखापरीक्षण करण्याच्या शासनाच्या सूचना असताना जिल्ह्यातील १३ हजार रुग्णांपैकी ७ हजार रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षणच झालेले नसल्याने अखेर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र देऊन यापुढे प्री ऑडीटशिवाय रूग्णांचे बील अदा केले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनीही सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना तातडीने उर्वरित लेखापरिक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील १३ हजार ६४३ रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करायचे होते. मात्र, त्यापैकी केवळ ६ हजार ५१८ रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्यात आले. ७ हजार १२५ रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण अद्यापही प्रलंबित आहे. लेखापरीक्षकांनी रुग्णालयातील ८० टक्के बेड्सचे विमा पॉलीसी व्यतिरिक्त लेखापरिक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लेखा परिक्षक व भरारी पथकांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
३४ लाखांवर अतिरिक्त आकारणी
जिल्ह्यातील ११८ खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून ३४ लाख ४० हजार ९११ रुपयांची अतिरिक्त बिले वसूल केल्याचे १ मार्च ते १५ मे दरम्यान झालेल्या लेखापरिक्षणातून समोर आले आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी बिलांचे ऑडीट झाल्यानंतर ही रक्कम समोर आली आहे. अद्याप ५० टक्के बिलांचे ऑडीट बाकी आहे.