जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 19 - ‘साक्री तालुक्यातील भागापूर हे आमचं गाव. 25 वर्षांपूर्वी मेंढरांच्या मागे निघालो आणि गाव सोडलं. तेव्हापासून वाट नेईल तिकडे पायपीट करतोयं आम्ही. त्यामुळं गाव सोडल, पाठोपाठ दिवाळी ही सुटली..’ 50 वर्षीय साळू बाळू गोरे या मेंढपाळाने अंधारात बुडालेल्या आपल्या दिवाळीची अशी कहाणी सांगितली. पंधरा दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यालगत तीन मेंढपाळ कुटुंबांनी काही दिवसांसाठी आपले वास्तव्य केले आहेत.
मराठवाडा आणि खान्देशात भटकंतीसाळू बाळू गोरे, महादू गोरे, हिरामण महादू गोरे ही मध्यम वयाची तीन भावंड. मेंढी आणि शेळीपालनचा पारंपारिक व्यवसाय ते करतात. मेंढय़ांना चारण्यासाठी 25 वर्षापूर्वी त्यांनी आपली बि-हाडं पाठीवर घेत गाव सोडलं. तेव्हापासून त्यांनी घराचा उंबरा पाहिला नाही. ‘जिथे आसारा मिळेल, तेच आमच गाव.’ असं ते हसून सांगतात. मराठवाडा, खान्देशात त्यांनी ही 25 वर्ष घालवली आहेत. एखाद्या गावात काही वर्ष किंवा काही दिवस ते मुक्काम करतात.
आकाशाचे छत, भुईचे अंगण भटकंती करीत असल्याने सण - उत्सवांचं त्यांना फारसं अप्रुप नाही. आकाशाचं छत आणि भुईचे अंगण दिवाळीचा आकाश कंदील कोणत्या उंब-याला बांधायचा.? असा साधा प्रश्न ते विचारतात. आकाशातल्या चांदण्या हेच आमचे आकाश कंदील. अस ते सहज बोलून जातात. वार्षिक कॅलेंडर त्यांना माहित नाही. त्यांच्याकडे एकूण 300 मेंढय़ा - शेळ्या असून लेंडीखत, मेंढय़ा विकून त्यांची गुजराण होते. एका बैलगाडीत मावेल एवढ्याच काय तो संसार. सणवाराचं कौतुक करणं आम्हाला परवडत नाही. चुलीवरची ऊन ऊन भाकर हेच आमचं जेवण आणि दिवाळीचं फराळही.. असं या तिघांच्या कारभारणीनं आनंदान सांगतात. मुलांची शाळाही सुटली मेंढपाळ असणा-या तिघा भावंडांना एकुण सहा मुलं आहेत. कुटुंबाच्या फिरस्तीमुळे त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलेले नाही. यातील सर्वात मोठा हिरामण हा 12 वषार्चा असून उर्वरीत पाचही दहा वर्षाच्या आतील आहेत. मुलं म्हणतात आम्हालाही फटाके फोडावे वाटतात. पण मिळत नाही.. साळू गोरे यांची एक मुलगी मात्र एस.टी. महामंडळाच्या साक्री आगारात वाहक म्हणून नुकतीच रुजू झाली आहे. आश्रमशाळेत शिकून ती 12 वी उत्तीर्ण झाली आहे.
प्रत्येक दिवस आमच्यासाठी सारखाच असतो. इच्छा असूनही सण साजरे करणे शक्य होत नाही. रोजच्या जगण्यासाठीच उधार-उसनवारी करावी लागते. गेल्या 25 ते 30 वषार्पासून पोटासाठी पायपीट करतोयं. त्यामुळे दिवाळी साजरी केलेली नाही.- साळू बाळू गोरे, मेंढपाळ