जीएमसीचा विरोधाभास : सुपरस्पेशालिटीसाठी अजून बरेच बदल अपेक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध झाल्याचा गौरव केला, त्याच दिवशी जळगाव जीएमसीत न्यूरोसर्जन नसल्याने एका व्हेंटीलेटरवरील रुग्णाला उपचार मिळाले नाही. या रुग्णाला अखेर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आणिबाणीच्या परिस्थिती एक बेड उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकाच दिवशी वैद्यकीय सेवेचे हे दोन विरोधाभास समोर आले आहेत.
कैलास संदीपान कदम या व्यक्तीचा २६ जानेवारी रोजी अपघात झाला होता. ही व्यक्ती हमाल असून कौटुंबिक परिस्थिती गरीबीची आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर ४ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला, कुटुंबाजवळची शिल्लक रक्कम संपल्यानंतर शिवाय रुग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता असताना कुटुंबावर संकट कोसळले होते. मात्र, नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे मदत मागितली तेव्हा त्यांनी तातडीने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आमच्याकडे व्हेंटीलेटर्स आहेत मात्र, न्यूरोसर्जन नाहीत, असे त्यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात चौकशी केली असता न्यूरोसर्जन आहेत मात्र, व्हेंटीलेटर नाही, अशी बिकट परिस्थित निर्माण झाल्यानंतर गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क केला व त्यावेळी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात या रुग्णालयात एक बेड देण्यात आला.
काय म्हणाले होते जिल्हाधिकारी ?
कोरोना विषाणूच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ३०० पेक्षा अधिक आयसीयू बेड व १२०० ऑक्सिजन युक्त बेड तयार करण्यात आले आहेत. ऑक्सिजन टँकचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दिली होती.
सिव्हिलला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल संबोधल्यावर अपेक्षित काय?
१ सर्व सुपर स्पेशालिस्ट विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स हवे
२ एमआरआय, सीटीस्कॅन सुविधा हव्या
३ रक्तासह अन्य सर्व तपासण्या एकाच ठिकाणी व्हाव्या
४ अत्याधुनिक मशिनरी, ती हाताळायला यंत्रणा हवी
५ आपत्कालीन विभागात पुरेशी जागा, साहित्य हवे
६ पुरेसे व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजनची सुविधा हवी
सिव्हीलचे वास्तव
१ प्रमख तज्ञ डॉक्टरांची कमतरता
२ सीटीस्कॅन मशिन अडिच वर्षांपासून बंद, एमआरआयची सुविधा नाही
३ अनेक तपासण्यांसाठी बाहेर जावे लागते
४ आपात्कालीन विभागात सद्यस्थिती केवळ चार बेड आणि स्ट्रेचर, व्हिलचेअर कमी
५ विद्युत पुरवठ्याची वायरिंग सुस्थितीत नाही.
६ पुरेसे व्हेंटीलेटर्स आहे, ऑक्सिजनची सुविधा आहे.
वर्षभरात बदल अन्यथा परिस्थिती असती बिकट
कोरोना पूर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. अनेक सुविधा नव्हत्या, व्हेंटीलेटर्स नव्हते. मात्र, कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बदल झाले अतिदक्षता विभाग अत्याधुनिक झाले. डॉक्टरांची संख्या वाढली. वैद्यकीय सेवेत बऱ्यापैकी सुसूत्रता आली आहे. काही त्रृटी कायम असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.