गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही, हे काम सध्या ५० टक्केच पूर्ण झाले आहे, तर पुलाचे जिल्हा परिषदेच्या बाजूने बाहेरील काम वर्षभरापासून बंद आहे. या ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब व उच्च क्षमतेच्या विद्युत लाईनचा अडथळा असल्याने हे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. विद्युत खांब हटविण्यासाठी मनपा ना जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे, हे काम रखडले आहे.
मात्र, गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलावरील गर्डर काढल्यानंतर, महावितरण प्रशासनाने लागलीच विद्युत खांब हटविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. ही प्रक्रिया राबवून, जळगावातीलच एका मक्तेदाराला विद्युत खांब हटविण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांनी मंजूर केलेला दीड कोटींचा निधी महावितरणकडे वर्ग झाल्यावर महावितरणतर्फे लागलीच या कामााला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युत खांब हटविण्यासाठी पुन्हा निविदा काढण्याची गरज नसल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.
इन्फो :
विद्युत खांबांना दिला लोखंडी तारांचा सपोर्ट :
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या मक्तेदाराने उड्डाणपुलाच्या बाहेरील काम करण्यासाठी विद्युत खांब हटविण्यापूर्वीच दोन्ही बाजूने तीन ते चार फुटांपर्यंत रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांबांचा मातीचा भराव निघाल्यामुळे, वाऱ्याने हे खांब पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत महावितरण प्रशासनातर्फे मनपा आयुक्तांना पत्र पाठवून, निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी मक्तेदाराला याबाबत सूचना देऊन, संबंधित मक्तेदाराने येथील विद्युत खांबांमध्ये मोठ्या आकाराचे दणकट असेल लोंखडी तार गुंतवून, हे तारांचे खिळे जमिनीत सिमेंट कॉंक्रीट करून बुजविले आहेत. यामुळे वाऱ्यामुळे खांब कोसळण्याची शक्यता कमी झाली आहे.