जळगाव : १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली असली तरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील महाविद्यालये उघडणार आहेत. सोमवारी तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना परवानगीसाठीचे पत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात कुठलीही कपात केली जाणार नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी झालेल्या विद्या परिषद व प्राचार्यांच्या ऑनलाईन बैठकीत दिली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही बैठका पार पडल्या. पन्नास टक्के क्षमतेने महाविद्यालय सुरू करावयाची असून विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, अशा सूचना कुलगुरूंनी केल्या आहेत. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पध्दतीने अध्यापन केले जाणार आहे. शंभर टक्के अभ्यासक्रम असणार असून त्यात कुठलीही कपात केलेली नाही. प्रात्यक्षिकासाठी उपस्थित राहता येणार नसल्यामुळे ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देता येणार आहे.