लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केरळसह इतर राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढत असला तरी जिल्ह्यात सुदैवाने ‘बर्ड फ्लू’चा सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले. पक्षीमित्रांकडून जिल्ह्यातील पाणथळांवर पक्षी निरीक्षण सुरू असून, यामध्ये आतापर्यंत एकही पक्षी मृतावस्थेत आढळून आलेला नाही. अनेक पक्षी उत्तर व दक्षिण भारताकडून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सुदैवाने एकही पक्षी मृतावस्थेत आढळून न आल्याचे पक्षी मित्रांचे म्हणणे आहे.
पक्षीमित्र राहुल सोनवणे यांनी सांगितले की, मेहरूण तलाव, गिरणा नदी परिसर असो वा हतनूर प्रकल्प परिसरात दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येतात. काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढत आहे. अनेक पक्षी मरण पावत आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ठराविक पाणथळांवर आम्ही निरीक्षण व पाहणी केली. यामध्ये युरोप, सैबेरिया, उत्तर भारताकडून अनेक पक्षी जिल्ह्यात दाखल झाल्याचे आढळून आले. मात्र, ‘बर्ड फ्लू’मुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आलेले नाही.
सुदैवाने यंदा पक्ष्यांवर ‘संक्रांत’ नाही
दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी मरण पावत असतात. मात्र, वन्यजीव संरक्षण विभागाकडून व विविध पक्षीमित्र संघटनांकडून होत असलेली जनजागृती यामुळे यंदा चायनीज मांजाच्या वापरात मोठी घट झाली असून, यंदा सुदैवाने एकही पक्ष्याचा मृत्यू या मांजामुळे झाल्याची घटना घडली नसल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी दिली.