मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकेही खराब होत असून, पाण्याअभावी वाढ खुंटत चालली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, आतुरतेने वाट पाहत आहे. अद्याप या परिसरात एकही दमदार पाऊस झाला नसून, नदी, नाले शेतातील विहिरी कोरडेठाक आहेत. नदी, नाल्यांनाही पाणी नसल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची उणीव भासत आहे.
फवारणीसाठी पाणीही नाही
शेतातील पिके सध्या मोठी झाली असून, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागत आहे. शेतातील विहिरींनी पातळी गाठली असून, काहींच्या शेतात पाणीही नसल्याने गावातून विकत टाकी घ्यावी लागत आहे. काहींना हात पंपावरून आणून शेतात फवारणी करावी लागत असल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. वाकोदसह परिसरात रखरखते उन्ह पडत असून, पावसाने पावसाचा कोणताच पत्ता दिसत नाही.
परिसर पावसावर अवलंबून
वाकोदसह जामनेर परिसरात शेतकरी वर्ग मोठा असून, २० टक्के वगळता पूर्णतः शेतकरी वर्गाची मान्सूनच्या पावसावर शेती अवलंबून असते. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा शेतकरी वर्गाला सोसाव्या लागत असतानाच, यंदाही पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जाच्या खाईत अडकण्याची चिन्हे दिसत आहे.
दिवसभरात वेळोवेळी मोसम बदलतोय
सकाळी आभाळ, दुपारी कडक उन्ह, संध्याकाळी ढगाळ वातावरण तर रात्री थंड वाऱ्यासह पावसाच्या आगमनाचे चिन्ह पाहता, वेळावेळात मोसम बदलत असल्याने नेमके पावसाचे आगमन होणार, तरी कधी अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने कपाशी पिकांवर रोगराई पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाअभावी खराब होत आहे. मकाही खराब होत असून, रोगाने थैमान मांडल्याने हातची पिके वाया जात आहे. शेतावर मोठा पैसा खर्च झाला असून, उत्पन्न हातातून जाताना दिसत आहे.
- दिलीप पाटील, शेतकरी, वडाळी, ता.जामनेर
परिसरात पाऊस नसल्याने यंदा पहिल्यांदाच पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. शेतात लावलेल्या पिकांवर फवारणीसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने टाकीभर पाणी विकत आणून फवारणी करावी लागत आहे, तसेच पाण्याअभावी जनावरांचे पाणी पिण्याचेही हाल होत आहेत.
- ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी, ता.जामनेर