लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ६ ते २४ तासांच्या आत मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे १६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे बाधितांनी लक्षणे जाणवल्यास तातडीने ऑक्सिजनची पातळी मोजून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. यात हॅपी हायपोक्सियाचा धोका उद्भवण्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी हॅपी हायपोक्सियाचे अधिक प्रमाणात रुग्ण समोर आले होते. यंदा झालेल्या रुग्णवाढीत त्यांची संख्या कमी आहे. मात्र, कमी वेळेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे गंभीर चित्र आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला जाणवल्यास तातडीने कोरोनाची टेस्ट करणे, ऑक्सिजनची पातळी मोजून घेणे हे करावे, असे जीएमसीचे डॉ. भाऊराव नाखले यांनी म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृत्यूंमध्ये कमी वेळात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही अधिक आहे. अगदी शेवटच्या क्षणी रुग्ण रुग्णालयात येत असून अशा वेळी डॉक्टरांच्या हातातही काहीच राहत नाही व रुग्ण दगावतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसात कमी वयांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, आजार अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून वारंवार करण्यात येत असते.
काय आहे हॅपी हायपोक्सिया
यात रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ८० पर्यंत खाली जाऊ शकते. मात्र, यात रुग्णाला याची कल्पनाही नसते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दुर्लक्षित करू नका, असे डॉक्टर सांगतात.
कोट
बाधित रुग्णांनी दर सहा तासांनी ऑक्सिजनची पातळी मोजावी. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. हॅपी हायपोक्सियात ऑक्सिजन पातळी घटलेली असते, मात्र रुग्णाला जाणीव होत नाही.
- डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषध वैद्यक शास्त्र विभाग