११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्या वादळाने उद्ध्वस्त केल्याने, हातातोडांशी आलेला घास मातीला मिळाला. त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी यांनी वादळग्रस्त गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
या वादळात तालुक्यातील आठशेवर शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर केळीबागा व शंभर हेक्टरवर लिंबू, मोसंबी, डाळिंब बागांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यात केळीबागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. एका-एका शेतकऱ्याचे लाखापासून ते पंधरा-वीस लाखांपर्यंत नुकसान झाले. शासकीय पंचनामे झाल्याने नुकसानभरपाई मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र दोन वर्षे होत आले तरी कवडीमात्र मदत न मिळाल्याने आपल्या तोंडाला नुसती पाने पुसली गेल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी ११ जूनला वादळाने केळीबागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. तत्कालीन पालकमंत्री,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी दौऱ्यावर आले. त्यांच्या समक्ष पंचनामे झाले. तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे. सरकार बदलले. आमदार-खासदार तेच आहेत. आमदार किशोर पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच अनेकदा केले. मात्र तालुका अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
-दीपक संभाजी महाजन, अध्यक्ष,
रा. काँ. किसान सेल, पिचर्डे, ता. भडगाव