चाळीसगाव : मका, ज्वारी शासकीय खरेदीसाठी नोंदणी होऊन महिना उलटल्यानंतरही मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली असून, तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, हरभरा खरेदी पूर्ण झाल्याची माहिती शेतकरी संघाने दिली.
चांगले भाव देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षांत कपाशीनंतर शेतकरी मका लागवडीला प्राधान्य देत आहे. साहजिकच हाती येणारे उत्पन्नही वाढले आहे. खासगी व्यापारी कमी भावाने ज्वारी, मका खरेदी करीत असल्याने उत्पादक शेतकरी शासकीय खरेदीकडे नोंदणी करतात. यंदा ३० एप्रिल रोजीच नोंदणीची प्रक्रिया संपली आहे. मात्र अजूनही प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
..........
चौकट
कोरोनाचा मार त्यात खरेदीचा नाही आधार
ज्वारी व मका हमीभावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्राचा आधार असतो. मोठ्या संख्येने भरडधान्य विक्रीसाठी शेतकरी शासकीय खरेदी केंद्राचा पर्याय निवडतात. गेल्यावर्षी कोरोना व त्यासोबत आलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना रब्बीचे उत्पन्न बरेच दिवस घरातच सांभाळावे लागले. यावर्षीही हीच स्थिती असून, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीची मोठी धूळधाण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उत्पादनही घटले आहे. कोरोनामुळे शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. अशा स्थितीत मका व ज्वारीची शासकीय खरेदीही अजून सुरू झाली नाही. यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे. खरिपाच्या तयारीसाठीही शेतकऱ्यांना मका, ज्वारीची खरेदी आर्थिक समस्या कमी करणारी ठरत असते. गेल्या वर्षी भरडधान्य खरेदीप्रक्रिया भडगाव शेतकरी संघाने राबवली होती.
....
चौकट
१५६४ शेतकऱ्यांची नोंदणी
ज्वारी, मका विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर १६०४ शेतकऱ्यांनी ३० एप्रिल रोजी अखेर नोंदणी केली आहे. यात ज्वारी विक्रीसाठी ९२८, तर मक्यासाठी ६३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मका १८५० रुपये प्रतिक्विंटल, तर ज्वारी २६२० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
......
इनफो
शासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तातडीने खरेदी सुरू करावी. येत्या आठ दिवसांत खरेदी सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करू. गेल्या वर्षीही येथील शेतकरी सहकारी संघातील भरडधान्य खरेदीतील घोळ उघड केला होता. याचा परिणाम गेल्या वर्षीच्या खरेदीचे काम भडगाव संघाकडे सोपविले गेले होते. शासनाने शेतकऱ्यांची संतप्त मागणी लक्षात घ्यावी.
- मंगेश रमेश चव्हाण,
आमदार, चाळीसगाव
........
चौकट
७११ क्विंटल हरभरा खरेदी
२३ मार्च ते ११ मे याकालावधीत शासकीय हमीभावाने हरभरा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नंतर याचदरम्यान शेतकरी संघाने ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलने हमीभावाने खरेदीप्रक्रिया पूर्ण केली. हरभरा विक्रीसाठी १३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ७८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणला. त्यांच्याकडून ७११ क्विंटल ५० किलो हरभरा खरेदी केला गेला.