लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. या शिकवणीला अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल, असा विश्वास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तालुका स्तरावरील गट समन्वयक व समूह समन्वयक यांच्या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत हेाते.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्याने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये राज्यात घ्यावयाच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांबरोबरच राज्यातील २२ हजार १७३ गावांचा कृती आराखड्यात समावेश असून त्या गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हे प्रशिक्षण आयेाजित करण्यात आले आहे. दरम्यान, ही कामे करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात टोल फ्री क्रमांक व नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, प्लास्टिक व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन या घटकांवरही काम करावे, अशा सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी केल्या. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे यांचीही यावेळी उपस्थिती होती.