मिलिंद कुलकर्णी
लॉकडाऊनचे चौथे पर्व संपताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पाचवे पर्व सुरु राहील, अशी घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना हे लॉकडाऊन केवळ कोरोनाचा उद्रेक झालेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहील, असा दिलासा दिलेला आहे. चौथे पर्व सुरु करताना १८ मे पासून रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी विभागणी केलेली होती. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे ही दोन महापालिका क्षेत्रे रेड झोनमध्ये आहेत, नंदुरबारसह उर्वरित तालुका क्षेत्रे ही नॉन रेड झोनमध्ये आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक ज्या पध्दतीने झाला, त्यामुळे संचारबंदी, जनता कर्फ्यू या नावाखाली प्रतिबंध कायम राहिले. त्यामुळे निर्बंध शिथील होत असले तरी स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील, त्याचीच अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनच्या चार पर्वात कोरोना बाधितांची संख्या टप्प्या टप्प्याने वाढली. बहुदा, मे अखेर हा उच्चांकी टप्पा असावा. नंदुरबारमध्ये अद्यापही स्थिती नियंत्रणात आहे. अधिकृतपणे तीन तालुक्यांमध्ये ३४ रुग्ण आहेत. तळोद्यातील रुग्ण नाशिकला उपचार घेत असल्याने तांत्रिकदृष्टया त्याची नोंद तिकडे आहे. गुजराथच्या सीमेवरील नवापूर आणि दुर्गम भाग असलेला धडगाव तालुका सुदैवाने अद्याप सुरक्षित आहे. धुळ्यात परिस्थिती नियंत्रणात असली तरी धुळे शहर हे शंभरीकडे वाटचाल करीत आहे, तर शिरपुरात आश्चर्यकारक रीत्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्यात रोजगारासाठी गेलेले स्थानिक मजूर परतल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची भीती खरी ठरताना दिसत आहे. जळगाव जिल्हा तर ७०० चा टप्पा ओलांडत आहे. जळगाव (१५६), भुसावळ (१६०), अमळनेर (१२८) या तीन शहरांपाठोपाठ भडगाव (७२), चोपडा (३८), रावेर (२९), पाचोरा (२६), यावल (१९), जळगाव ग्रामीण (१६), धरणगाव (१४) या तालुक्यांमध्ये बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दिलासा एवढाच आहे की, बोदवड आणि मुक्ताईनगर तूर्त तरी संसर्गापासून दूर आहेत. अनलॉक करीत असताना कोरोनासंबंधी सुरक्षेची पुरेपूर उपाययोजना करावी लागणार आहे. ६९ दिवस लोक घरात कैद होते. आता निर्बंध हटविल्याने गर्दी होणार आहे. त्यावेळी सुरक्षित अंतर, मास्क या गोष्टींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यातील सगळ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. त्यासोबतच कोवीड रुग्णालय, विलगीकरण कक्षातील सोयी-सुविधा, प्रयोगशाळेतून लवकर अहवाल मिळतील, यासाठी प्रयत्नांची आता खरी गरज आहे. देशातील सरासरी मृत्यूदरापेक्षा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील मृत्यूदर तिप्पट-चौपट आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यूदर कमी करण्यावर आता आरोग्य प्रशासनाचा भर असायला हवा. जिल्हा बंदी व राज्यबंदी हटविली जात असताना आणि १ जूनपासून रेल्वे व विमानसेवा सुरु होत असताना संगर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही पुरेशी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, आपण त्यावर मात केलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे.६९ दिवस लॉकडाऊन असलेला देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली असताना निर्बंध शिथील होत असल्याने दुहेरी आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.जून-जुलैत उद्रेकाची शक्यता लक्षातघेऊन अनलॉक करताना पुरेशी सावधगिरी, खबरदारी घ्यायला हवी. कोवीड रुग्णालय व विलगीकरण कक्षात पुरेशा सोयी-सुविधा, लवकर नमुने घेणे, त्याचे अहवाल येणे या बाबींकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींवर निर्बंध ठेवणे गरजेचे असल्याने कठोरपणे परिस्थिती हाताळावी लागणार आहे.