जळगाव : केंद्र शासनाचा पथविक्रेता कायदा लागू झाल्यानंतर ६ वर्षांच्या कालावधीनंतर मनपाने शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २४ सदस्यांच्या नियुक्तीसाठी मनपाकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच समिती स्थापन होऊन जूनअखेर फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, नोंदणी व त्यांना देण्यात येणाऱ्या विक्रीच्या जागा याबाबतचे विषय प्रलंबित होते. ‘नास्वी’ या संस्थेने यासंदर्भात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याबाबत मागणी केली होती.
२२ हॉकर्सचा माल जप्त
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांलगत व्यवसाय करण्यास हॉकर्सला मज्जाव केला असताना देखील सुभाष चौक, बळिराम पेठ, शिवाजी रोड भागात व्यवसाय करीत असलेल्या २२ हॉकर्सवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या हॉकर्सचा माल मनपाने जप्त केला आहे. कारवाईदरम्यान, काही हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाला.
महापौरांनी केली नालेसफाईची पाहणी
जळगाव : शहरात पावसाळा सुरू झाला असताना देखील शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराकडून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने सोमवारी महापौर जयश्री महाजन यांनी शहरातील नालेसफाईची पाहणी केली. यामध्ये लेंडी नाल्यालगत असलेला मातीचा ढिगार काढण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा सूचना महापौरांनी दिल्या आहेत, तर नाल्यालगत काढून फेकण्यात आलेला गाळदेखील साफ करण्याचा सूचना महापौरांनी दिल्या. दरम्यान, वेळेवर नालेसफाई न झाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक किशोर बाविस्कर व नवनाथ दारकुंडे यांनी दिला आहे.
यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश वन्यजीव संरक्षक अ. मो. अंजनकर (नाशिक) यांनी काढले आहेत. दरम्यान, अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य हे देखील खुले करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानुसार कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे पालन करून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
आसोद्यातील खारी डोहात कोसळली कार
जळगाव : आसोदा - जळगाव रस्त्यावर इतिहासकालीन खारी डोह असून, या डोहात रविवारी रात्री एम.एच. १९, बी.जे. २७३४ या क्रमाकांची एक कार कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या अपघातात दोनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसोदा भागातील तलाव हा खारी डोह म्हणून प्रसिद्ध असून, या तलावाचे क्षेत्रफळ १ हेक्टरहून जास्त आहे. यातील खारी माती ही वाघूर पाटचारीचे काम करताना तत्कालीन ठेकेदाराने खारी मातीचा उपसा करताना अगदी रस्त्यालगत केला आहे. याबाबत कोणतीही काळजी न घेतल्याने हा खारी डोह तलाव जीवघेणा ठरत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी इथे संरक्षक भिंतीची मागणी केली आहे; पण प्रशासन दखल घेत नाही. या रस्त्यावरून वाहतूक लक्षणीय वाढली आहे. मात्र, प्रशासन लक्ष देत नसल्याने याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.