सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान सोनवणे हे मूळचे बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना येथील रहिवासी असून रोजगारानिमित्त ते जळगावात आले आहेत. रायपूर येथे संजय परदेशी यांच्या मालकीच्या घरात ते एक वर्षापासून पत्नी सुमन यांच्यासह वास्तव्याला आहेत तर मुलगा मोहन हा पत्नीसह गोपाळपुरा भागात वास्तव्याला आहे. एमआयडीसीत त्यांनी चहाची टपरी लावली असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दिवसा स्वयंपाक करण्यापुरते घरी थांबतात व रात्री दोघे पती-पत्नी चहाच्या दुकानातच झोपतात. शुक्रवारी रात्री पत्नी स्वयंपाक करून दुकानावर आली तर मुलगा याने रात्री १० वाजता इनव्हर्टर चार्जिंगला लावून परत घर बंद केले होते. शनिवारी सकाळी सात वाजता पत्नी सुमन घरी गेली असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले तर दागिने व रोकड ठेवलेली कोठी उघडी दिसली. त्यातील ऐवज गायब झालेला होता. रात्रंदिवस मेहनत करून जमविलेली रोकड चोरट्यांनी लांबविल्याने सोनवणे दाम्पत्याला मोठा धक्का बसला.
चहा विक्रेत्याचे घर फोडून ३८ हजाराचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:13 AM