अमित महाबळ
जळगाव : एक स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या डॉ. नीता बेंडाळे - भोळे या दररोज, अशा एका आव्हानात्मक कामाला सामोरे जात असतात, की सर्वसामान्य महिला त्याची कल्पनाच करू शकत नाही.डॉ. नीता बेंडाळे - भोळे या जळगाव जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांचे काम आहे शवविच्छेदन करण्याचे आणि त्यांनी आजवर असंख्य मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. पण हे काम करताना एखादे मातामृत्यूचे प्रकरण आले, की त्यांचेही मन हळवे होते.
शवविच्छेदनात मृत्यू आधीच्या सर्व बाबींची पडताळणी करावी लागते. एक स्त्री व एक आई म्हणून या प्रकारचे शवविच्छेदन करणे त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी असते. सासर-माहेर अशा दोन्हीकडील कुटुंबांची होणारी घालमेल, आक्रोश मन हेलावून टाकणारा असतो. डॉ. नीता बेंडाळे - भोळे यांनी शासकीय सेवेत असताना गेल्या १० वर्षात हजारो शवविच्छेदन केले आहेत. सर्वात पहिले यावलच्या ग्रामीण रुग्णालयात केले. शिक्षण घेत असताना धुळे येथे न्यायवैद्यक शास्त्र विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक शवविच्छेदन पाहिले पण भीती वाटली नव्हती. मात्र, स्वत:नेच एखादे शवविच्छेदन करावे लागण्याचा अनुभव त्यांच्यासाठी वेगळा होता आणि आजही तो त्यांना लक्षात आहे. ते शवविच्छेदन एका कुजलेल्या मृतदेहाचे होते. डॉक्टर जेवण करून आल्या होत्या. शवविच्छेदन करताना त्यांच्या पोटातील सर्वच्या सर्व जेवण उलट्यांद्वारे बाहेर पडले होते. नंतर त्यांना हळूहळू सवय होत गेली, तसा हा त्रास कमी होत गेला.
इथे लागतो शिक्षणाचा कस
शवविच्छेदन करताना आव्हानात्मक काम असते ते म्हणजे हत्या, खून, बलात्कारानंतर हत्या या विविध घटनांचे. हे सर्व करीत मृत व्यक्तीस आपल्या शिक्षणाचा, सचोटीचा लाभ होऊन न्याय मिळावा यासाठी डॉक्टरांना धडपड करावी लागते. शासकीय रुग्णालयात दिवसाला कमीत कमी पाच ते सहा शवविच्छेदन होत असतात. डॉ. नीता बेंडाळे - भोळे यांचा उच्चांक म्हणजे एके दिवशी त्यांनी दिवसभरात १२ शवविच्छेदन केले आहेत. तो संपूर्ण दिवस त्यांना शवविच्छेदनगृहात घालवावा लागला होता. त्यांचे एमबीबीएस धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तर डीजीओ नाशिकला झाले आहे. स्पर्धा परीक्षेद्वारा त्या फेब्रुवारी २००९ मध्ये वैद्यकीय अधिकारी गट - अ या पदावर शासकीय सेवेत रूजू झाल्या आहेत. त्यांनी जळगावच्या आधी यावल ग्रामीण रुग्णालयात काम केले आहे.