आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : दुकान मालक व ग्राहकाचे लक्ष विचलित करुन दुकानातून मोबाईल लांबवितांना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेल्या सौरभ नंदकिशोर गावंडे (वय १९ रा.खेडी, ता.जळगाव) याला शहर पोलिसांनी सहा तासातच जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गावंडे याच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले असल्याचा संशय असून या मुलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते.
अमित अशोक तुलसानी (रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांचे गोलाणी मार्केटमध्ये रिध्दी सिध्दी नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून शनिवारी दुपारी तीन ते साडे तीन या कालावधीत सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. अमित तुलसानी यांनी याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानुसार सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण मोबाईल चोरताना स्पष्ट दिसत होता तर त्याच्या शेजार दोन जण दिसत होते.
या फुटेजचा आधार घेऊन तपासी अमलदार दीपक सोनवणे, संजय भालेराव, मोहसीन बिराजदार, प्रणेश ठाकुर, अक्रम शेख व सुधीर साळवे यांनी संशयिताचा शोध घेतला असता रात्री साडे नऊ वाजता गावंडे हा गोलाणीत फिरताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मोबाईल व आणखी तीन असे चार मोबाईल आढळून आले. दरम्यान, या चोरट्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्या.व्ही.एच.खेळकर यांनी त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.