जळगाव : शहरातून दुचाकी चोरणाऱ्या भैय्या उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (३२, रा.कन्हेरे, ता.अमळनेर ह.मु. खेडी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून १५ ऑक्टोबर रोजी मोसीनशहा सलीम शहा (रा.रथ चौक) यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.४८ ए.एस.८३०७) चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही दुचाकी भैय्या उर्फ गोपाळ याने चोरल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे किशोर पाटील व सुधीर साळवे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो खेडीत आढळून आला. त्याच्याकडे आणखी एक चोरीची दुचाकी आढळली. ही दुचाकी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची त्याने कबुली दिली. अधिकच्या चौकशीत त्याने आणखी तीन अशा एकूण पाच चोरीच्या दुचाकी काढून दिल्या. या दुचाकींची किमत १ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे. त्याने आणखी दुचाकी केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याची पोलीस कोठडी मागितली. न्या.सुवर्णा कुळकर्णी यांनी त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.प्रिया मेढे यांनी काम पाहिले.ही कारवाई उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इम्रान सय्यद व गणेश शिरसाळे यांनी केली. दरम्यान, संशयिताविरुध्द अमळनेर व साक्री येथेही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
चोरीच्या पाच दुचाकीसह चोरटा जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 6:47 PM