जळगाव : कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेही लाॅक झालेले आहेत. खासकरून चोरटेही घरबंद झाल्याने चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झालेली आहे. दुसरीकडे मात्र खून, खुनाचा प्रयत्न व हाणामारी यासारख्या शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये काहीअंशी वाढ झालेली आहे.
जळगाव जिल्ह्यात २०१९ मध्ये चोरीच्या १२४७ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ४४७ गुन्हे उघडकीस आले. २०२० मध्ये १४१२ चोरीच्या घटना घडल्या. त्यात ४०६ घटना उघडकीस आल्या. चालू वर्षात आतापर्यंत चोरीच्या ५७ घटना घडलेल्या आहेत. दरवर्षी एका महिन्यात चोरीच्या १२९ च्यावर घटना घडतात. या चार महिन्यात फक्त ५७ घटना घडलेल्या आहेत. बलात्काराच्या घटनातदेखील यंदा घट झालेली आहे. अपहरण व फसवणुकीचे प्रकार वाढू लागलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे वर्षभरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सण-उत्सव देखील साधेपणाने आणि व शांततेत साजरे झालेले आहेत. कुठेही त्यांना गालबोट लागलेले नाही. ही पोलीस दलाची जमेची बाजू आहे. लाॅकडाऊन काळ, संचारबंदीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. कलम १८८ अन्वये हे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे अदखलपात्र आहेत. एकूणच लाॅकडाऊन व कोरोनाने गुन्ह्यांना लाॅक केलेले आहे.
२०१९ मधील चोरीच्या घटना : १२४९
२०२० मधील चोरीच्या घटना : १४१२
मार्च २०२१ पर्यंत चोरीच्या घटना : ५७
खुनाच्या घटना वाढल्या
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. चोरी, घरफोडी यासारख्या घटना कमी झाल्या असल्या तरी खून व खुनाचा प्रयत्न या शरीराविरुद्धच्या घटना मात्र वाढलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव शहराला लागूनच असलेल्या कुसुंबा येथे मुरलीधर पाटील व आशाबाई पाटील या पती-पत्नीचा खून झाला. जानेवारी महिन्यात चार व फेब्रुवारी महिन्यात पाच घटना खुनाच्या घडलेल्या आहेत.
बलात्काराच्याही घटनांमध्ये घट
२०१९ मध्ये बलात्काराच्या जिल्ह्यात १०९ घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये त्यात घट होऊन ९१ घटना घडल्या. चालू वर्षात जानेवारी ७ व फेब्रुवारीत ११ अशा या दोन महिन्यात १८ घटना बलात्काराच्या घडलेल्या आहेत. कोरोना लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे.
कोट...
घरात घुसून रोकड व दागिने या प्रकारातील चोरीच्या घटनांमध्ये घट झालेली आहे. कधी कधी चोरीच्या घटनांमध्ये वाढ दिसते, त्यात सर्वाधिक मोबाईल व दुचाकींचा समावेश आहे. प्रत्येक तक्रार दाखल करून घेतली जात असल्याने आकडा वाढलेला दिसतो.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक