जळगाव : दुचाकी चोरायच्या व त्या कमी किमतीत गहाण ठेवून मिळणाऱ्या पैशात मौजमस्ती करणाऱ्या आरिफ शरिफ तडवी (वय २४ रा.पहूर ता. जामनेर) व चेतन संजय चव्हाण (वय २३ रा.लोहारा ता.पाचोरा) या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. पाचोरा, पहूर, पिंपळगाव हरेश्वर व जामनेसह विविध ठिकाणांहून त्यांनी दुचाकी चोरल्या आहेत.
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन पोलीस ठाण्यांप्रमाणेच स्थानिक गुन्हे शाखेलाही तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पहूर येथील आरिफ तडवी हा दुचाकी चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, रवी नरवाडे, महेश महाजन, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, दीपक चौधरी, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांच्या पथकाने आरिफच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून साथीदाराची माहिती मिळाल्यावर चेतन चव्हाण यालाही अटक करण्यात आली. दोघांकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १९ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून पाचोरा येथील ८, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ३, जामनेर पोलीस स्टेशनचे २, पिंपळगाव हरेश्वर २ व पहूर पोलीस स्टेशनमधील १ असे दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.