पाळधीहून चोरली दुचाकी : दोघांना जळगावातून अटक
फोटो
जळगाव : पाळधी (ता. धरणगाव) येथून सोमवारी रात्री चोरट्यांनी दुचाकी लांबविली अन् अवघ्या १२ तासातच दुचाकीसह दोघे चोरटे जळगावात जेरबंद झाले. गोविंदा डिगंबर जाधव (वय १८) व नितीन गजानन माळी (वय १९) दोन्ही रा. पाळधी अशी त्यांची नावे आहेत. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
पाळधी येथे साईबाबा मंदिराच्या पाठीमागे सोनार गल्लीतून समाधान ज्ञानेश्वर पाटील (वय ३०) यांची दुचाकी (क्र. एम.एच.१९ सी.डी.३८२८) सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चोरी झाली होती. दरम्यान, दोन जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी भास्कर मार्केटला आल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शेखर जोशी व तुषार जावरे या दोघांना मिळाली. पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर जोशी, तुषार जावरे, प्रवीण भोसले, रामेश्वर ताठे, भरत बारी, विनोद पाटील या कर्मचाऱ्यांनी भास्कर मार्केटमधून दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत गोविंदा डिगंंबर जाधव व नितीन गजानन माळी रा. पाळधी अशी त्यांची नावे समोर आली. दोघांना खाकीचा हिसका दाखविल्यावर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. दुचाकीच्या चेसीस क्रमांकावर शेखर जोशी यांनी दुचाकी मालक निष्पन्न केला. पाळधी येथील समाधान ज्ञानेश्वर पाटील यांची ती दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी दोघांना धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.