फोटो : ६.३४ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भावाचे निधन झाल्यामुळे दोंडाईचा येथे गेलेल्या बिंदिया नरेश रायचंदे यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. एक लाख रुपयांची रोकड व पाच तोळे सोने असा एकूण अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना कंजरवाडा भागात शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
कंजरवाडा भागात बिंदिया रायचंदे वास्तव्यास आहेत. त्यांच्या भावाचे हृदयविकारामुळे निधन झाल्याने गेल्या १० दिवसांपासून त्या दोंडाईचा येथे गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घरकाम करणारी तरुणी घराच्या कंपाऊंडमध्ये साफसफाई करीत असताना, तिला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तिने तत्काळ बिंदियाबाई यांचा पुतण्या संतोष रायचंदे यांना ही माहिती दिली. संतोष यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना कुलूप तुटलेले व कपाट फोडलेले दिसून आले. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. पाहणीअंती संतोष यांना १ लाख रुपयांची रोकड व पाच तोळे सोने चोरीला गेल्याचे दिसून आले.
पोलिसांनी केली पाहणी
संतोष रायचंदे यांनी एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधला आणि चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच श्वानपथकदेखील घटनास्थळी दाखल झालेले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.