लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलन पेठेतील ब्रिजविलास स्वीटमार्टसह व्यास लॉटरीचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून एकूण सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
नागेश्वर कॉलनीतील रहिवासी सतीश मुरारीलाल अग्रवाल यांचे पोलन पेठेत ब्रिजविलास स्वीटमार्ट नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारीच रितेश व्यास (रा.पोलनपेठ) यांचे लॉटरीचे दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. सोमवारी नेहमीप्रमाणे दुकानांना कुलूप लावून अग्रवाल व व्यास हे घरी निघून गेले. मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून स्वीटमार्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्क्रु ड्रायव्हरच्या साहाय्याने ड्रॉव्हर तोडून त्यातील ८ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर व्यास यांचे दुकान फोडून ७ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
मालकाला दिसले...दुकानाचे कुलूप तुटलेले
सतीश अग्रवाल हे नेहमीप्रमाणे सात ते साडेसात वाजेच्या सुमारास कारागिरांसह स्वीटमार्ट दुकानावर आले. त्यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसून आले. आत प्रवेश केल्यानंतर ड्रॉव्हरमधील रक्कम आणि चेक तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे दिसून आले. काही वेळानंतर रितेश व्यास यांच्या वडिलांनाही मुलाचे दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. नंतर रितेश याने दुकानात जाऊन पाहिले असता, सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तर सात हजारांची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले.
चोरट्याने केला सीसीटीव्ही बंद
ब्रिजविलास स्वीटमार्टमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्यामुळे चोरीचा संपूर्ण प्रकार त्यात कैद झाला आहे. चोरी केल्यानंतर दुकानात सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात येताच चोरट्याने तेदेखील बंद केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. दुपारी सतीश अग्रवाल व रितेश व्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.